शत्रू समोर आल्यावर अचूकपणे लक्ष्य कसे भेदायचे, कोणकोणती शस्त्र वापरायची, याची प्रात्यक्षिके नाशिकच्या स्कूल ऑफ आर्टिलरी सेंटरच्या वतीने करण्यात आली यामुळे उपस्थितांना प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थिती पाहिल्याचा अनुभव आला. ‘सर्वत्र प्रहार’ या अगदी नावाप्रमाणेच विविध शस्त्रांद्वारे शत्रूवर हल्ला करण्याच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

१२० एमएम ची मोर्तास गन, १५५ एमएम सोल्तम, १०५ एमएम इंडियन फिल्ड गन १०५ लाईट गन १३० एमएम मिडीयम गन, १५५ एमएम एफएच ७७ बी बोफोर्स १२२ एमएम मल्टी बॅरेल रॉकेट लॉंचर जिआरएडी बीएम २१ आदि शस्त्रांची प्रात्यक्षिके झाली. यानंतर पिनाका, स्मेर्च व ब्रम्होस अशा विविध रॉकेट्स व मिसाईल्स यांची भेदकता उपस्थितांना पहावयास मिळाली.

एरियल वाहने, सीसीटीव्ही कॅमेरे असलेले पॅराशुट (पॅरा ट्रूपर्स), लक्ष्य अचूकपणे टिपणारी यंत्रसामग्री, शत्रूने लपवून ठेवलेले शस्त्र शोधणारे रडार यंत्र या दरम्यान दाखवण्यात आले. शस्त्रांची क्षमता, मारा, वेग व सैन्यदलाचे कौशल्य या संचलनाद्वारे उपस्थिताना पहावयास मिळाली. मानवी शृंखलेने हेलिकॉप्टर्सवर दोरीने चढून काही जवान हवेत भरारी घेत मार्गस्थ झाले. एका प्रात्यक्षिकात ८६ किलोची तोफ (मोर्तार्स) एका जवानाने खांद्यावर उचलून नेली. रशिया व भारताने मिळून बनवलेले ब्राम्होस मिसाईल लॉंचर यावेळी दाखवण्यात आले.

देवळाली छावणीतील डोंगरावरील ‘हरभरा’ व ‘डायमंड’ या रेंज मार्किंगवर विविध शस्त्राद्वारे रॉकेटचा मारा करत प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. यावेळी सीसीटीव्ही असलेले पॅराशुट तसेच सैन्यदलातील चिताह, चेतक व विविध प्रकारचे हेलिकॉप्टर्सची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. संचलन संपल्यानंतर प्रात्यक्षिकात दाखवलेले विविध शस्त्र, तोफा व हेलिकॉप्टर्स उपस्थितांना जवळून दाखवण्यात आले. या सर्व बाबींची माहितीही उपस्थिताना देण्यात आली. यावेळी लेफ्टनंट जनरल सुब्रत सहा, लेफ्टनंट जनरल पी. के. श्रीवास्तव, मेजर जनरल जे एस बेदी, तसेच नेपाळ, भूतान, श्रीलंका या देशातील सैन्य दलाच्या काही तुकड्या व आयआयटी इंजिनीअर्स यावेळी उपस्थित होते.