मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावासाने शनिवारी रात्री उशीरा हजेरी लावली. याचबरोबर काल नाशिक, सोलापूर, जळगाव आदी ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा तडाखा बसला. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परिणामी एकीकडे सरकारकडू कर्जमाफीचा दिलासा मिळत असताना, दुसरीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी काहीसा धास्तावला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषकरून द्राक्ष उत्पादक व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. वादळी पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांमध्ये वीजपुरवठा देखील खंडीत करण्यात आला होता. या पावसामुळे कांद्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तसेच, गहू, हरभरा, करडी तूर, ज्वारी या पिकांचे देखील नुकसान होणार असल्याचे दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर आणि तालुक्यातील काही भागात गारपीट झाली. तर सोलापूर शहरासह बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ व जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात हलक्या गारा पडल्या. औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात जोरादार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड, बदनापूर, भोकरदन व जालना शहरासह औद्योगिक वसाहत परिसरात अवकाळी पावसाने शनिवारी रात्री उशीरा हजेरी लावली.