17 January 2021

News Flash

नाशिक : आमोदे फाटा चेक पोस्टवरील पोलिसांवर गावगुंडाचा हल्ला

अज्ञात हल्लेखोरांविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – जळगाव जिल्हाच्या सीमेवर नांदगाव – चाळीसगाव रोडवर असलेल्या आमोदे फाटा चेकपोस्टवर बंदोबस्तास असलेल्या पोलीस पथकावर येथून जवळच असलेल्या सायगाव बगळी येथील काही अज्ञात गाव गुंडांनी हल्ला केला. या वेळी घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेले पोलीस शिपाई प्रदीप बागुल यांच्या डोळ्याला मार लागला  तसेच अनिल शेरेकर  या पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी फाडण्यात आल्याने हल्लेखोरांविरोधात रात्री उशिरा सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नांदगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून जिल्हा बंदी करण्यात आली असून जिल्ह्याच्या सीमा या सील करण्यात आल्या आहेत. नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची सीमा असलेल्या अमोदे फाट्यावर नांदगाव पोलिसांकडून चेक पोस्ट तयार करण्यात आला आहे. या चेक पोस्टवर नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अनिल शेरेकर (२४२६ ) व प्रदीप बागुल ( १५३१ ) हे  कर्तव्य बजावत असताना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव जिल्यातील सायगाव बागळीकडून एका मागोमाग तीन दुचाकी आल्याने त्यांना चेक पोस्टवर विचारपूस करण्याकरिता अडवण्यात आले. यानंतर प्रथम थांबलेल्या दुचाकीवरील व्यक्ती कडे चौकशी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा पास किंवा नाशिक जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी कोणताही वैद्यकीय परवाना नसल्याने त्यामुळे त्यांना परत पाठवले.  हे पाहून या दुचाकीस्वाराचा पाठीमागे असलेल्या इतर दोन मोटरसायकली देखील आलेल्या दिशेनेच निघुन गेल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सायगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून वीस ते पंचवीस अनोळखी व्यक्तींनी चेक पोस्टच्या दिशेने येऊन कर्तव्य बाजाबत असणाऱ्या पोलिसांवर अचानक हल्ला करत त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात पोलीस शिपाई बागुल यांच्या डोळ्याला मार लागल्याने दुखापत झाली. तर, अन्य पोलीस कर्मचारी शेरेकर यांची वर्दी फाडण्यात आली तसेच खुर्च्यांची देखील तोडफोड करण्यात आली.

पोलीस शिपाई अनिल शेरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायगाव येथील पोलीस पाटील आबा शिंदे ,पत्रकार गोकुळ मंडळ, युवराज शिंदे, धोंडीराम कुट्टी वाले यांचा मुलगा दत्तू माळी ,सुनील विठोबा आहेर यांचा मुलगा व त्यांच्या त्यांच्यासोबत असलेल्या अजून दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/ २०२० भादवीस कलम ३५३,३३२,३२४,१४३,१४७, १४९, १८८ ,२६९,२७० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच, या घटनेची गंभीर दखल घेत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उपनिरीक्षक दळवी आदींनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती घेत पोलिसांवरचे हल्ले खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. यानंतर रात्री उशिरा चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनीही घटनास्थळी भेट देत झालेल्या प्रकाराची चौकशी करत झालेल्या घटनेची निंदा केली.  या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 6:11 pm

Web Title: nashik village goons attack police at amode fata check post msr 87
Next Stories
1 Lockdown: शेकडो मैल दूर असलेल्या डॉक्टर आईच्या कार्याला चिमुकलीचा सलाम
2 Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्येने 600 चा टप्पा ओलांडला, 61 नवे पॉझिटिव्ह
3 विधान परिषद निवडणूक; अजित पवारांनी कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळला
Just Now!
X