महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचं एक वेगळं महत्त्व असून हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजपाची नजर आता बारामतीवर आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या भाजपाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी बारामतीत कमळ फुलवणार असल्याचे विधान केले होते. त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माहेरघर असणाऱ्या बारामती शहरात ठिकठिकाणी ‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही.’ अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. बारामती शहरातील प्रशासकीय भवन, नगरपालिका, पंचायत समिती अशा वर्दळीच्या ठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. त्याखाली समस्त बारामतीकर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे पोस्टर नेमकं कोणी  लावलेत याबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, पोस्टरवरील आशयावरून हे तरी स्पष्ट झाले आहे की, हे पोस्टर भाजपाला अनुसरूनच लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या  आवाहनाला आणि दाव्यावर हे पोस्टर उत्तर आहे. बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, असं पोस्टरवर लिहून भाजपाला उत्तर दिलं आहे अशी चर्चा शहरात आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री आणि अमित शाह – 

यंदा भाजपा राज्यात 43 जागा जिंकेल आणि 43 वी जागा ही बारामतीची असेल, असे भाकित मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्तवले होते. तर, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत आणि त्यातील एक जागा बारामतीचीही हवी असं अमित शाह म्हणाले होते.