दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आलेले केंद्रीय कृषी पथक संत्रा व मोसंबी बागांच्या नुकसानीची पाहणी न करताच परतले. विदर्भात अतिवृष्टीने संत्रा व मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांसाठी शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार सुनील शिंदे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय कृषी पथक बुधवार व गुरुवारी विदर्भातील ९ जिल्ह्य़ांच्या पाहणी दौऱ्यावर होते. त्यात नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर व वर्धा यासह अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशीम या जिल्ह्य़ांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिके, रस्ते, शासकीय इमारतींच्या नुकसानाची पाहणी केली.
विदर्भात अमरावती व नागपूर जिल्ह्य़ात संत्रा व मोसंबीची मोठी लागवड करण्यात आलेली आहे. जास्त पाऊस व थंड वातावरणामुळे मृग बहार आलेला नाही. अंबिया बहार कडक उन्हात सापडल्यामुळे गळून गेला आहे. उन्हाळ्यात अनेक बागा वाळून गेल्या. याबाबत मुख्यमंत्री, फलोद्यान तसेच कृषिमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतरही पाहणी झाली नाही. विदर्भातील संत्रा व मोसंबीच्या नुकसानीबाबत पाहणी करण्याच्या सूचना पवारांनी विदर्भातील दौऱ्यात द्याव्या, अशी मागणीही शिंदे यांनी केली.
केंद्रीय कृषी पथकाने विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. कृषी आयुक्त बकवाड यांनी राज्यातील शेतीच्या नुकसानीची विस्तृत माहिती सादर केली, तर मदत व पुनर्वसन सचिव मििलद म्हैसकर यांनी माहिती देताना राज्यात सर्वात जास्त अतिवृष्टी झालेले जिल्हे, तालुके, जीवित व वित्तहानी, तसेच राज्य शासनाने केलेल्या मदत व पुनर्वसनाच्या कार्याचा आढावा घेतला. यात संत्रा व मोसंबीच्या नुकसानीकडे लक्षच देण्यात आले नाही.
विदर्भात आलेल्या केंद्रीय पथकाला संत्राबागेची पाहणी करण्यास सांगावे, अशी विनंती शिंदे यांनी विभागीय आयुक्त वेणु गोपाल रेड्डी यांना केली. या पथकासमोर संत्र्यांबाबत केवळ चर्चा करण्यात आली. परंतु, नुकसानीची पाहणी करण्यासाठी निर्देश देण्यात आले नाहीत.