राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास प्रतिष्ठानच्या वतीने निफाड तालुक्यातील चितेगाव फाटय़ाजवळील केंद्रात १३ व १४ मार्च रोजी पाचव्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कांदा पीक सुधारणा आणि बीजोत्पादन’ या विषयावर समूह चर्चा होणार असल्याची माहिती केंद्राचे अधिकारी डॉ. आर. पी. गुप्ता यांनी दिली.
केंद्राने कांदा व लसूण यांच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या असून, केंद्रीय जात प्रमाणीकरण समिती यासाठी सक्रिय आहे. देशातील कांदा आणि लसूण पिकांचे महत्त्व आणि इतर सर्व बाबींविषयी मंथन करण्यासाठी या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात कांदा व लसूण पिकांवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करतील. प्रत्येक तांत्रिक सत्रातील मुद्दय़ांवर पुन्हा मुख्य तांत्रिक सत्रात चर्चा करण्यात येऊन त्या शिफारशी संलग्न संस्थेकडे तसेच भारत सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठविल्या जातील. चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे यांच्या हस्ते होणार असून, या वेळी डॉ. जी. कल्लू उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रानंतर १५ मार्चच्या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी डॉ. एन. के. कृष्णकुमार उपस्थित राहणार आहेत. कांद्याची देशात वर्षभर उपलब्धता कशी ठेवता येईल यावर चर्चा करण्यात येणार आहे.