News Flash

जुनेच पदाधिकारी ठेवल्याने भाजपमध्ये नाराजी

महानगरपालिकेत सत्ता गमविण्याची नामुष्की पत्करावी लागल्याने भाजपची मंडळी सावध झाली आहेत.

जुनेच पदाधिकारी ठेवल्याने भाजपमध्ये नाराजी

|| दिगंबर शिंदे

सांगली जिल्हा परिषदेत इच्छुकांची चलबिचल; महापालिके त सत्ता गेल्याने पक्ष सावध

 

सांगली : नेत्यांनी शब्द देऊनही जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल टाळला जात असल्याने सांगली जिल्हा परिषेदेतील भाजप सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या नाराजीला पक्षातूनच खतपाणी मिळत असल्याचा आरोपही होत आहे. महानगरपालिकेत सत्ता गमविण्याची नामुष्की पत्करावी लागल्याने भाजपची मंडळी सावध झाली आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन यावरून सत्ताधारी भाजपमध्येच फू ट पडल्याचे दिसून आले. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ऑनलाइन सभेचा आग्रह धरत सभा पूर्ण झाली असून सभेपुढील सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगितले, तर ही सभा तहकूब झाल्याचा दावा सत्तेमध्ये सहभागी असलेल्या काही सदस्यांनी केला आहे.

ऑनलाइन सभेला विरोध करण्यासाठी सत्ताधारी गटातील दोन सभापती प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी यांच्यासह अरुण बालटे, सरदार पाटील, सरिता कोरबू यांच्यासह खासदार गटाचे डी. के. पाटील हे आघाडीवर होते. मुळात सभा ऑफलाइन की, ऑनलाइन हा विषय कोणाच्याच प्रतिष्ठेचा नसून पक्षाच्या सुकाणू समितीकडून आणि पक्ष नेतृत्वाकडून दिलेला शब्द पाळला जात नसल्याचा राग इच्छुकांच्या मनात आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षाची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून आता ज्यांना शब्द दिला आहे त्यांना किमान अखेरच्या सात आठ महिन्यांची तरी संधी मिळावी, अशी आग्रही मागणी आहे.

एकसंध ठेवण्याचे आव्हान

इच्छुकांची मागणी रास्त असली आणि पक्षाच्या नेत्यांची अनुकूलता जरी असली तरी महापालिकेत महापौर निवडी वेळी झालेली मानहानी पुन्हा वाट्याला नको अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची आहे. कारण अगोदरच काठावरची सत्ता आहे, पदाची संधी नाकारल्याने जर कोणी विरोधात गेला तर हातची सत्ता जाण्याची भीती आहे. महापालिकेपेक्षा भाजपची जिल्हा परिषदेत बिकट अवस्था आहे. कारण शिवसेनेचे तीन, रयत विकास आघाडीचे चार आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटाचे दोन सदस्य यांच्या पाठिंब्यावर भाजपचे सत्तेत आहे. जर का पदाधिकारी बदल करायचाच म्हटले तर या घटक पक्षांची मोट कोण बांधणार हाही प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांना एकसंध ठेवण्याचे शिवधनुष्य कोण पेलणार हाही कळीचा मुद्दा आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश

अशा अस्थिर वातावरणात भाजप सत्ता राबवत असताना पलूस तालुक्यातील नितीन नवले यांनी पक्षत्याग करीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. नवले यांना काँग्रेसमध्येच जायचे होते, मात्र, काँग्रेस नेतृत्वाने याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही असेही सांगितले जाते. आता जतमधील दोन सदस्य काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असले तरी त्यांचीही दोलायमान स्थिती झाली आहे. जर भाजपमधून बाहेर पडले तर पुढील राजकीय भवितव्याची शाश्वती काँग्रेसकडून हवी आहे ती देण्यास सध्याचे नेतृत्वाकडून अनुकूलता सध्या तरी दिसत नाही.

जिल्हा परिषदेमध्ये पदाची संधी मागणे यामध्ये गैर काही नाही. करोना संकटामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली असली तरी हा आग्रह सोडून देण्यात आलेला नाही. नजीकच्या काळामध्ये पदाधिकारी बदल हा करावाच लागेल अशी भूमिका खासदार संजयकाका पाटील यांची आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेला वरिष्ठ पातळीवरून फारसा अनुकूल प्रतिसाद हातची सत्ता जाण्याच्या भीतीने मिळत नाही ही वस्तुस्थिती.

कार्यकाल अवघा सात-आठ महिन्यांचा उरला असताना धोका पत्करण्याची मानसिकता कोणाचीच नाही. सत्ता काबीज करण्यापेक्षा पुढील निवडणुकीमध्ये वर्चस्व राखण्यासाठीच राष्ट्रवादीला तोडफोडीत स्वारस्य दिसते आहे.  मेगाभरती करून केलेला पक्ष विस्तार भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी आपला पक्ष विस्तार करीत असताना राज्यात सत्तेत असूनही संधीचा फायदा घेण्याची काँग्रेस नेतृत्वाची मानसिकताच दिसत नाही.

भाजपअंतर्गत नेत्यामध्ये ताळमेळ नसल्याने  सदस्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीतूनच बहुतांशी भाजपचे सदस्य बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. कामाची संधी बरोबरच आपल्या भागाचा विकास व्हावा अशी कार्यकत्र्याची भावना असते. काम करण्याची संधी आणि जिल्ह्याच्या समतोल विकास पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच शक्य आहे. – अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

 

जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांमध्ये बेबनाव निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असला तरी पक्षाचे सदस्य एकसंध आहेत. काही नेते स्वत:ला पक्षापेक्षा स्वत:ला मोठे समजत आहेत. मात्र, भाजपवर विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते अशा भूलथापांना बळी पडणार नाहीत. – पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष भाजप.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 12:03 am

Web Title: national congress party bjp is dissatisfied with keeping old office bearers akp 94
Next Stories
1 नांदगावपेठ क्षेपणास्त्र प्रकल्पाचे काम ठप्पच
2 हातवन सिंचन प्रकल्पाच्या निर्मिती खर्चात पाचपट वाढ
3 सोलापूर : गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक; म्हणाले, “गोळ्या घातल्या तरी…!”
Just Now!
X