News Flash

तिरंगा बनविणाऱ्या हातांना जगण्याची भ्रांत

दिवसभराच्या सूतकताईच्या मेहनतीचे मूल्य फक्त शंभर रुपये

|| प्रदीप नणंदकर

दिवसभराच्या सूतकताईच्या मेहनतीचे मूल्य फक्त शंभर रुपये

राष्ट्रवादावरच्या चढय़ा आवाजातील चर्चा देशभर सुरू असताना उदगीरच्या खादी ग्रामउद्योगात वयाच्या ८०व्या वर्षी मुन्नाबी खाजासाब अजूनही चरखा चालवितात. दिवसभर सूत कताई केल्यानंतर त्यांना मिळतात १०० ते ११० रुपये. जगण्याची भ्रांत मिटावी म्हणून  खादीसाठी काम करणाऱ्या ६०० मजुरांचे जिणे हलाखीचे आहे.

मुन्नाबी यांना मुले, नातवंडे आहेत, पण ते त्यांच्या संसारात. मुन्नाबीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. त्यांनी आयुष्यभर किमान वेतन न घेता तिरंगा ध्वजासाठी सूत कातले. त्यांचे हातपाय थकले आहेत. आता कसे जगावे ही भ्रांत काही संपली नाही. त्यांची मैत्रीण सय्यद मोहसीन अली यांनी अलीकडेच काम थांबविले. आयुष्य खादीसाठी राबूनही त्यांच्या हाती काहीच पडले नाही. तिरंगा तयार करणारे हात आता कमालीचे दुबळे पडले आहेत. चरखा चालविणारे पंतप्रधानांचे छायाचित्र झळकले होते तेव्हा त्यांना आशा होती. आता तीही विरली आहे. सूत काढण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या कामगारांना किमान वेतन मिळायला हवे, अशी नांदेड विभागातील महाव्यवस्थापक अरुण किनगावकर यांचीही मागणी आहे. खादी ग्रामउद्योगाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचेही ते सांगतात.

विशेष म्हणजे मराठवाडा खादी ग्रामोद्योगचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. उदगीर, औसा, अक्कलकोट, नांदेड, कंधार अशा विविध ठिकाणी खादी ग्रामोद्योगचे काम चालते. पण बहुतांश ठिकाणी तोटा असल्याने लातूर येथे खादी व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या बब्रुवान पोतदार यांचे वेतन अलीकडेच केवळ दहा हजार रुपयांपर्यंत गेले. कामगारांच्या मानधनात आता वाढ केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतरही त्यांना मिळणारी रक्कम केवळ १०० रुपये एवढीच आहे. राज्यभर राष्ट्रध्वज उंच उभारण्यासाठी स्तंभ तयार केले जात आहेत. त्यावर ७० लाख ते एक कोटींचा खर्च केला जातो, पण जे हात तिरंगा बनवितात त्यांना मात्र काहीच मिळत नाही. तिरंगा बनविणारे हात कमालीच्या हलाखीच्या स्थितीत असले तरी त्याकडे ना गळय़ात सूताचा हार घालणाऱ्यांनी लक्ष दिले ना सूत कताई करतानाचे खास छायाचित्र काढणाऱ्यांनी. खादीचे कापड अजूनही पडून असते. साधारणत: पाच ते सहा कोटी रुपयांची खादी विकली गेली तरी बरेच प्रश्न सुटतील, असे किनगावकर सांगत होते.

तिरंग्याचे कोलमडलेले अर्थकारण

खादी ग्राम उद्योगाने केलेल्या १८ हजार ३३४ तिरंगा ध्वजाची विक्री झाली. सर्वाधिक किमतीचा आणि लांबी, रुंदी अधिक म्हणजे १४ बाय२१ चा ध्वज १७ हजार ८२० रुपयांना मिळतो. सर्वात कमी म्हणजे टेबलवर ठेवण्यासाठी लागणारा ध्वज ६० रुपयांमध्ये मिळतो. या वर्षी म्हणजे १ एप्रिल २०१८ ते २४ जानेवारी २०१९ पर्यंतची एक कोटी ३६ लाख २५ हजार १३५ रुपये तिरंगा ध्वजातून खादी ग्राम उद्योगास मिळाले. पूर्वी एक हजार मीटर सूत कताई केल्यास साडेपाच रुपये मिळत आता ही रक्कम साडेसात रुपये करण्यात आली आहे. मूळ दुखणे खादी ग्राम उद्योगातील वस्तू विक्रीमागे सरकारकडून २० टक्के सवलत दिली जात असे. ही रक्कम नंतर शासन खादी ग्राम उद्योग मंडळास देत. गेल्या सात वर्षांपासून सवलतीचा निधी राज्य सरकारकडून दिला जात नाही. परिणामी बिघडलेले अर्थकारण सुधारणे जवळपास अशक्य होऊ लागले आहे.

कामगारांची वाताहत..

राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्याचे काम उदगीर व कर्नाटकातील धारवाड येथून केली जाते. उदगीरच्या खादी ग्रामोद्योग केंद्रात तयार होणारे राष्ट्रध्वज दहा प्रांतात वितरीत केले जातात. वर्षभरातील राष्ट्रध्वजाच्या विक्रीची उलाढाल एक ते सव्वा कोटीपर्यंतची असते. उलाढाल वाढली की कोणीतरी कामाचे कौतुक करते, पण सूत कताईमध्ये आयुष्य घालविणाऱ्या कामगारांची वाताहत सुरू आहे.

हाती काय मिळते?

सूत कातणे, हातामागावर विणकाम करणे, तिरंगा ध्वजाचे रंगकाम, त्याची शिलाई असे अनेक काम खादी ग्राम उद्योगात होते. एक मीटर कापड तयार करण्यासाठी साधारणत: १३५ ग्राम सूत लागते. तर एक मीटर कापड विणकामासाठी २४ रुपये ७० पैसे असा दर आहे. तर अहमदाबादमधील एका सरकारमान्य कंपनीतून कपडय़ाला तिरंगा रंग दिला जातो. त्यांना तिरंगा रंगविण्यासाठी प्रतीमीटर ४० रुपये दिले जातात. या अर्थकारणामुळे तिरंगा बनविणाऱ्यांच्या हातात फारसे काही पडत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:40 am

Web Title: national flag of india
Next Stories
1 फळबागा सुकल्या, शेतकरी हैराण ; मराठवाडय़ात चाऱ्याची टंचाई कायम
2  ‘टँकर आवडे सर्वाना’!
3 घरात बेकायदा गर्भिलग चाचणी; डॉक्टरला अटक
Just Now!
X