नीरज राऊत/हेमेंद्र पाटील

पालघरमध्ये हायड्रोजन सिलिंडर वाहतुकीदरम्यान अपघातांची मालिका कायम

तारापूर औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या हायड्रोजन वायूची वाहतूक नागरिकांसाठी धोकादायक ठरली आहे. काही दिवसांपूर्वी अतिशय धोकादायक अशा हायड्रोजन वायूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने बोईसर-चिल्हार रस्त्यावरील वाहतूक काही काळ रोखून ठेवण्यात आली होती. अशा प्रकारचे अपघात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दोन ते तीन महिन्यांत घडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि लगतच्या रहिवाशी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

हायड्रोजन वायू काही सिलिंडर एकत्रितपणे केलेल्या रचनेत(बॅटरी) वाहनांमध्ये आणला जातो.  हायड्रोजनच्या सिलिंडरचा समूह वाहून नेणारा ट्रक चिल्हार रस्त्यावर अलीकडेच उलटल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.

या अपघातादरम्यान वायुगळती झाली नाही, अन्यथा अनर्थ घडला असता, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली. यापूर्वी चारोटी येथील उड्डाणपुलावर  हायड्रोजन सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला होता. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती. यापैकी एका अपघातात एका वाहनचालकाचा मृत्यूही  झाला होता. यामुळे हायड्रोजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये वेग नियंत्रक बसवण्याची गरज आहे. अशा धोकादायक आणि घातक रसायन वा वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील चालकाने मद्य  केले आहे का, याची काटेकोर तपासणी होणे, गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. सध्यातरी महामार्गावर अशी  तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे वाहनांच्या गतीवर मर्यादा नाहीत. त्यामुळे भरधाव वाहनांवरील ताबा सुटून येथे अपघात घडत आहेत, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या हायड्रोजन सिलेंडरमध्ये सुमारे २०० बार इतके प्रेशर (दाब) असतो ज्या वेळेला हायड्रोजनचे सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनांना  अपघात होतो, त्याप्रसंगी हे उच्च दाब असलेले सिलिंडर खाली पडल्याने त्यांच्या नोझल मधून वायूची गळती होते हायड्रोजन हा अति ज्वलनशील वायु असल्याने या वायूचा हवेत साठा झाल्यास किंवा त्यांच्या मुखावर आग लागून स्फोट होण्याच्या घटना अपघातानंतर होताना दिसतात. असे असले तरी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग व बोईसर चिल्हार रस्त्यावर होत असलेले हायड्रोजन सिलेंडर वाहणांचे अपघात यावर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वारंवार होणाऱ्या अपघातामुळे मोठय़ा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यातच बोईसर— चिल्हार मुख्य रस्त्यावर नागझरी येथे झालेला हायड्रोजन सिलेंडर वाहनाचा अपघात याठिकाणी काही अंतरावरच दोन पेट्रोल पंप होते. एकही सिलिंडरमधून वायूगळती झालेली नव्हती.

* हायड्रोजन सिलिंडरमधून गळती झाल्यास आणि त्याचा आगीशी संपर्क आल्यास लहान आकाराच्या सिलिंडरचा स्फोट हाऊ शकतो. अशा स्फोटांमुळे सिलेंडरच्या धातू चा भाग दूरवर जोरात फेकले जातात. त्यामुळे जीवितहानीची शक्यता असते.

* आग पसरण्याची शक्यता असते अशा आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा परिसरात उपलब्ध नसल्याने हायड्रोजन सिलेंडरला आग लागल्यानंतर स्फोट होऊ लागल्यास संपूर्ण परिसर रिकामी ठेवला जातो. तारापूर औद्य्ोगिक वसाहतीमध्ये हायड्रोजनचा वापर करणारे अनेक कारखाने असून अशा ठिकाणी कच्चा माल म्हणून हायड्रोजन आणणाऱ्ऱ्या वाहतूकदारांना योग्य प्रकारे समज देण्याची आवश्यकता आहे.