23 January 2020

News Flash

‘राष्ट्रवादी’चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अडचणीत

५ ऑगस्टपर्यंत नोटिशीला उत्तर द्यायचे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांना, तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे. या पक्षांना ५ ऑगस्टपर्यंत नोटिशीला उत्तर द्यायचे आहे.

  • देशात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा किती पक्षांना आहे?

सध्या आठ राजकीय पक्षांना ‘राष्ट्रीय पक्ष’ असा दर्जा आहे. भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे आठ राष्ट्रीय दर्जा असलेले पक्ष आहेत.

  • राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे पक्षांना कोणता फायदा होतो?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह देशभर राखीव असते. म्हणजेच राष्ट्रवादीचे घडय़ाळ हे चिन्ह देशात अन्य कोणत्याही राजकीय पक्षाला मिळू शकत नाही. चार राज्यांमध्ये निवडणूक लढवायची असल्यास राष्ट्रीय पक्षांना वेगवेगळे चिन्ह घ्यावे लागत नाही. निवडणूक प्रचार काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीवर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळते.

  • राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी कोणत्या अटी आणि शर्थी असतात?

लोकसभेच्या चार जागाजिंकण्याबरोबरच चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मते मिळवणे आवश्यक असते किंवा तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या दोन टक्के जागा जिंकणे बंधनकारक असते किंवा चार राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक किंवा राज्य पक्षाचा दर्जा आवश्यक असतो. या अटींची पूर्तता झाली तरच राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

  • राष्ट्रीय पक्षांचा दर्जा किती वर्षे टिकतो?

पूर्वी दर पाच वर्षांनी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या मतांच्या आधारे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा दर्जा निश्चित केला जात असे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता होती. पण निवडणूक आयोगाने २०१६ मध्ये केलेल्या एका सुधारणेनुसार दहा वर्षांनी राजकीय पक्षाचा दर्जा निश्चित केला जाणार आहे. परिणामी, पाच वर्षे सर्वच पक्षांना मुदतवाढ मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘बसप’चे दहा खासदार निवडून आले. याशिवाय मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांमध्ये पक्षाची कामगिरी बऱ्यापैकी होती. यामुळे ‘बसप’चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम राहणार आहे.

  • राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेसकडून निकषांची पूर्तता झाली नाही का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात चार आणि लक्षद्वीपमध्ये एक असे एकूण पाच खासदार निवडून आले असले तरी महाराष्ट्र आणि नागालॅण्ड या दोनच राज्यांमध्ये पुरेशी मते मिळाली. तृणमूल काँग्रेसलाही पश्चिम बंगालच्या बाहेर अन्य तीन राज्यांमध्ये सहा टक्के मते मिळालेली नाहीत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचीही तशीच परिस्थिती आहे. या तीन पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यास देशात पाचच राष्ट्रीय दर्जा असलेले पक्ष राहतील.

First Published on July 22, 2019 2:07 am

Web Title: national party election commission of india ncp mpg 94
Next Stories
1 ‘ब्राऊन राईस’च्या नावाखाली फसवणूक
2 टोमॅटोचा दर शंभरीपार
3 मनसे, वंचित आघाडीने प्रस्ताव दिल्यास वरिष्ठ पातळीवर विचार करू -थोरात
Just Now!
X