पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दशकांपासून सत्तेत व विरोधी अशा दोन्ही भूमिकांमध्ये सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणखी एक परिवर्तनवादी निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा राष्ट्रवादी पहिलाच पक्ष ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध समुदायासाठी अनेक सेल आहेत. आता राष्ट्रवादीनं परिवर्तनवादी व क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पक्षानं एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निश्चित केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एल.जी.बी.टी. हा नवीन सेल सुरू करण्यात आला आहे. एलजीबीटी समुदायला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादीनं हा सेल सुरू केला असून, आज (५ ऑक्टोबर) दुपारी १२.३० वा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

राजकीय पक्षाचे समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी स्वतंत्र सेल कार्यरत असतात. या सेलच्या माध्यमातून त्या समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होतो. त्यामाध्यमातून समस्या जाणून निराकरण करण्याचा प्रयत्नही केला जातो.