27 October 2020

News Flash

Coronavirus: …त्यामुळं आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही होम क्वारंटाइनची वेळ

"शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या अविवेकीपणामुळे घरात बसण्याची वेळ"

जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर

राज्यात लॉकडाउन आणि संचारबंदी असतानाही नियमांचा भंग करुन शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर हे दोन दिवसांपूर्वी मुंबईहून बीड शहरात परतले होते. मुंबईहून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, याचा फटका त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही बसला आहे. त्यांनाही होम क्वारंटाइन राहण्याचे प्रशासनाने बजावले आहे. क्षीरसागर काका-पुतणे कुटुंबासह एकाच बंगल्यात राहतात.

राज्यात सर्वाधिक करोनाच्या रुग्णांची संख्या असलेल्या मुंबई शहरातून जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये परतले होते. त्यांच्या स्वार्थी आणि अविवेकीपणामुळे आपल्यालाही घरातच बसावे लागत असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसला तरी क्षीरसागर काका-पुतण्यातील राजकीय आरोपांचा संसंर्ग मात्र वाढला आहे.

दोन दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर हे मुंबईहून औरंगाबादमार्गे खाजगी वाहनाने बीड शहरात आले होते. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर हे काका-पुतणे नगर रस्त्यावरील एकाच बंगल्यात वास्तव्याला आहेत. काका जयदत्त क्षीरसागर यांचे आगमन होताच पुतणे संदीप यांच्या समर्थकांनी जयदत्त हे कोरोनाबाधित मुंबई शहरातून आले असल्याने त्यांच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी त्यांना इतरत्र क्वारंटाइन करावे अशी मागणी केली होती.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ जयदत्त क्षीरसागर यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरातच क्वारंटाइन राहण्याचे आदेश दिले. तर मंगळवारी याच बंगल्यात राहणारे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसागर यांनाही होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. क्षीरसागर यांच्या बंगल्यातील सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. जिल्ह्यात करोनाबाधित एकही रुग्ण सापडला नसल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकही निश्चिंत आहेत. मात्र, क्षीरसागर काका-पुतण्यातील आरोपांच्या संसर्गाने राजकीय करमणूक होऊ लागली आहे.

काकांच्या अविवेकीपणामुळे घरात बसण्याची वेळ – संदीप क्षीरसागर

कोरोना संकटात पहिल्या दिवसांपासून प्रशासनाला सोबत घेवून जंतू नाशकाची फवारणी, स्वस्त धान्य वाटपाबाबत पाठपुरावा केला. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून आता खरी गरज असतानाच जयदत्त क्षीरसागरांच्या अविवेकी वागण्यामुळे मला घरात बसण्याची वेळ आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 6:09 pm

Web Title: nationalist congress party mla sandeep kshirsagar also on home quarantine aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 भाजपा आमदार सुरजितसिंह ठाकूर व शिवसेनेचे संभाजी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल
2 केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
3 अत्यावशक सेवा व सलग उत्पादन प्रक्रियेच्या सबबीखाली उत्पादन सुरू ठेवण्याचा घाट
Just Now!
X