खेडय़ातील पर्यावरणही ऐरणीवर

‘पर्यावरण आणि अर्थकारण’ परिसंवादातील सूर
शहराचेच नव्हे तर खेडय़ातील पर्यावरणसुद्धा ऐरणीवर आले आहे. भारतात प्रदूषण करणारा एक आणि त्याचे परिणाम मात्र दुसऱ्यालाच भोगावे लागत आहेत. त्यावर त्वरित तोडगा निघाला नाही तर शहर विरुद्ध खेडी असा संघर्ष उभा राहील, असा सूर ‘पर्यावरण आणि अर्थकारण’ या परिसंवादात उमटला.
ग्रामीण भागातील जनसमुदाय आणि पाणी यावर भाष्य करत असतानाच जलतज्ज्ञ राजेंद्र स्िंाह अमेरिका आणि भारत या दोन देशाची यासंदर्भातील तुलना केली. निसर्गापासून घेण्यापेक्षा निसर्गासाठी देणाऱ्या जमातीला सोबत घेऊन चाललात तर सुदृढ पर्यावरणाची अपेक्षा करता येईल. गावखेडय़ातील या जमातीत नकारात्मक गोष्टी सकारात्मक बनविण्याची वृत्ती आहे. त्यांच्याकडून ही वृत्ती आत्मसात केली तर पर्यावरणसुद्धा सकारात्मक दिशेने वळेल, असे मत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
पर्यावरण संज्ञेच्या प्रवासाची अमेरिकेतून झालेली सुरुवात आणि त्याचा प्रवास पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी मांडला. हवामान बदलाचा धोका जेवढा गांभीर्याने घ्यायला हवा, तेवढय़ा गांभीर्याने तो घेतला जात नाही. या धोक्यामुळेच आपण पर्यावरण असंतुलनाच्या दिशेने चाललो आहोत. एक टक्का लोकांनी एक टक्का लोकांसाठी चालवलेले राज्यही त्यासाठी कारणीभूत आहे, असे मत अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. माणसाच्या गफलतीमुळे पर्यावरणाचे निर्माण झालेले प्रश्न उद्योजक आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. विवेक भिडे यांनी मांडले. विकासाच्या नावाखाली माणसाने कुवतीपेक्षा केवळ हव्यासापायी केलेली ढवळाढवळ पर्यावरणाच्या नाशासाठी कारणभूत ठरली आहे. या आधुनिकीकरणात ग्रामीण भागाचा टक्का व अधिकार हिरावून घेऊ नका, असा सल्ला डॉ. विवेक भिडे यांनी दिला.