निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील फळबागांना बसला आहे. आंबा, नारळ, सुपारी आणि काजू बागां वादळामुळे उध्वस्त झाल्या आहेत. शेकडो फळ झाडे उन्मळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. हे नुकसान कसे भरून काढयचे? याच विवंचनेत ते अडकले आहेत.

३ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर धडकले होते. यावेळी ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. तीन तास वादळ किनारपट्टीवरील भागात सक्रीय होते. गावच्या गाव या वादळाच्या कचाट्यात सापडली होती. निसर्गाच्या या प्रकोपापुढे सगळेच जण हतबल ठरले.  या चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील फळबागा अक्षरशः उध्वस्त झाल्या.  आंबा, काजू, नारळ आणि सुपारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अलिबाग तालुक्यातील चौल येथील दशरत घरत यांची नारळ, सुपारीची बाग आहे. या बागेतून येणाऱ्या उत्पन्नावरच त्यांचे घर चालते. मात्र निसर्ग वादळाने त्यांची फळबाग उध्वस्त केली आहे. त्यांच्या बागेतील २०० हून अधिक सुपारीची झाडे उन्मळून पडली आहेत. तर २५ नारळाची झाडही मोडून पडली आहे. आंबा आणि फणसाच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक वर्षांपासून जोपासलेली झाडे  क्षणार्धात नष्ट झाल्याचे पाटील सांगतात.

उस्मान सोंडेकर यांची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. त्यांच्याही नारळ फोफळीच्या बागेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. दीडशेहून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. वाडीतील घराचेही सुकसान झाले आहे. वाडीत काम करायला मजूरही उपलब्ध नाहीत. या परिस्थितीला सामोर जावे तरी कसे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. एक झाड पिकते होण्यासाठी पाच ते सहा वर्षाचा कालावधी लागतो. त्यानंतर ते झाड उत्पादन देण्यास सुरवात करते. मात्र वादळामुळे पिकती झाडे नष्ट झाल्याने हे नुकसान भरून निघण्यासाठी बराच कालावधी लागेल अशी धास्ती त्यांना वाटते आहे.

दशरत पाटील आणि उस्मान सोंडेकर हे केवळ प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. जिल्ह्यातील बहूतांश बागायतदारांची अशीच अवस्था आहे. कोकणात बागायतींना वादळी पाऊस काही नवीन नाही. इथे दरवर्षी हजारो मिलीमिटर पाऊस पडत असतो. वारेही वाहतात. किरकोळ नुकसानही होत असते. मात्र या निसर्ग वादळाचा प्रकोप थरकाप उडवणारा होता. बागायतदारांचे अस्तित्वच मुळापासून हलवणारा होता. मोठ्या कष्टाने जोपासलेल्या फळबागा क्षणार्धात उध्वस्त करणारा होता. शासनाने या नुकसानचे पंचनामे करून बागायतदारांना मदत करावी, अशी मागणी आता बागायतदारांकडून केली जात आहे.