शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनातील झेंडे बनवण्याचं काम सुरू असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे हे काम भाजपाच्या पनवेल कार्यालयातच सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे हे आंदोलन प्रकल्पग्रस्तांचं उत्स्फूर्त आंदोलन नसून फक्त भाजपाकडून करण्यात आलेलं आंदोलन असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे सहचिटणीस दीपक म्हात्रे यांनी या व्हिडीओमागचं सत्य सांगितलं आहे.

आंदोलनाच्या मागे भाजपा असल्याचा आरोप!

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करणारं आंदोलन गुरुवारी झालं. हे आंदोलन प्रकल्पग्रस्त, सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्तपणे केल्याचं देखील सांगितलं गेलं. मात्र, या आंदोलनामागे भाजपा असल्याचा आरोप करण्यात आला. त्यापाठोपाठ संबंधित व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे त्या आरोपावर अधिकच चर्चा होऊ लागली होती. विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून शिवसेना आणि राज्य सरकारची कोंडी करून विमानतळाचे कंत्राट मिळवण्यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचं देखील बोललं गेलं.

मुंबईलाही पनवेलहूनच गेले झेंडे

“या मानवी साखळीच्या आंदोलनात सामील झालेल्या प्रकल्पग्रस्तांना चहा, वडापाव, समोसे, पाण्याच्या बाटल्या, शाकाहारी बिर्याणी याचे वाटप केले जात होते. आंदोलनात कामोठे व जासई ग्रामस्थांनी सढळ हस्ते सुमारे आठ लाखांची मदत केली असल्याची चर्चा होती. मात्र, हे आंदोलन प्रकल्पग्रस्तांपुरतीच नव्हे तर इतर समाजाच्या ५० ते ६० सामाजिक संस्थांचा देखील यामध्ये सहभाग असून लोकवर्गणीतून हे आंदोलन करण्यात आलं”, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे सहचिटणीस दीपक म्हात्रे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. “भाजपासह इतर राजकीय पक्षांचा देखील आंदोलनात सक्रीय समावेश होताच. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आवाहन केल्यावरही अनेक प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सामील झाले होते. पनवेल, उरणसह मुंबईलाही काही झेंडे पनवेलहूनच पाठविण्यात आले असले तरी नेमके किती झेंडे आंदोलनात वापरण्यात आले याची माहिती सांगता येणार नसल्याचे सहचिटणीस म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?

गैरसमज पसरवण्यासाठी व्हिडीओ व्हायरल?

१७ एप्रील रोजी सिडको महामंडळाने लोकप्रतिनिधींपैकी एकही सदस्य संचालक मंडळात उपस्थित नसतानाही विमानतळाच्या नावाचा राजकीय निर्णय का घेतला? असा प्रश्न प्रकल्पग्रस्त समितीने उपस्थित केला आहे. २०१३ नंतर वेळोवेळी लोकसभेत त्यानंतर विधिमंडळात दि. बा. पाटील यांच्या नावाची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे गुरुवारचे आंदोलन एकट्या भाजपाचे नसून ते सर्व प्रकल्पग्रस्तांचे होते, असेही स्पष्टीकरण समितीच्या वतीने देण्यात आले आहे. पावसाळ्यात मोकळी जागा उपलब्ध नसल्याने आणि पनवेलची जागा कार्यकर्त्यांना मिळाल्याने या झेंड्यांचे काम त्याठिकाणी होत आहे. काहींनी गैरसमज पसरवण्यासाठी ही चित्रफीत पसरवली असल्याचं म्हात्रे यांनी सांगितलं.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव; एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती

“पहिल्याच आंदोलनाने यांना घाम फुटलाय”

दरम्यान, या वादावर बोलताना, “पहिल्याच आंदोलनाने घाम फुटलाय त्यामुळे हे उपद्रव सुचत आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात कार्यकर्ते कष्ट घेऊन आंदोलनाची तयारी करत असल्याची ही चित्रफीत आहे. विरोधकांना नेमका कसला त्रास होतोय तो त्यांनी जाहीर करावा. दि. बा. पाटील यांच्यासाठी सर्वच स्तरातून सर्वच समाजाने पाठिंबा देऊन कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरले हे प्रकल्पग्रस्तांचे यश पाहवत नसेल तर त्याला आम्ही काय करणार? अजूनही लढाई बाकी आहे. पनवेल उरण तालुक्यांपेक्षा इतर जिल्ह्यांमधून मिळालेल्या प्रतिसादामुळे पुढील आंदोलनाची उर्जा मिळाली”, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे.