News Flash

मनसेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नवी मुंबई शहराध्यक्षांचा राजीनामा

पालिका निवडणुकांपूर्वी मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

एकीकडे पक्ष जम बसवण्याचे प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. मनसेच्या काही बड्या नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पक्षाचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याची माहिती काळे यांनी दिली.

येत्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच गजानन काळे यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शुक्रवारी नवी मुंबई मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात खंतही व्यक्त केली आहे. नवी मुंबईत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. परंतु काही पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ततर काही जणांनी अमित ठाकरे यांच्या मोर्च्याच्या एक दिवस आधी आपले राजीनामे दिले. या राजीनाम्यांमागे त्यांचा मोर्चा अयशस्वी व्हावा की काय अशी शंकाही यातून निर्माण होत असल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

जिल्हाध्यक्ष अविनाथ जाधव आणि अभिजित पानसे यांनी लक्ष घातल्यानंतर गटबाजी सुरू झाल्याचा थेट आरोप काळे यांनी केला आहे. तसंच कोणतीही कारणमिमांसा न करता अविनाश जाधव यांनी आपल्याला या घटनेचं दोषी ठरवल्याचं काळे यांनी या पत्रात नमूद केलं आहे. या घटनांमुळे आपण व्यथित झालो आहोत आणि या प्रकारात पक्ष संघटनेची दुसरी बाजू जाणून घेण्याची तसदीही घेण्यात आली नाही. नवी मुंबईत पक्ष उभारी घेत असताना हे आपल्याला पहावणार नाही. तसंच अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करणंही आपल्याला जमणार नाही. त्यामुळे यापुढे केवळ महाराष्ट्र सैनिक म्हणूनच आपण काम करणार असल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 8:51 am

Web Title: navi mumbai mns gajanan kale resigns from his post friday jud 87
Next Stories
1 वाहनतळावरून वादंग
2 पनवेल शहरात आठवडय़ातून  एक दिवस पाणीपुरवठा बंद
3 महापौर निवासस्थान परिसरातील रहिवासी बेजार
Just Now!
X