03 April 2020

News Flash

वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करणारी ‘झोमॅटो गर्ल’ अटकेत

वाशी येथील सेक्टर 17 मधून या मुलीला अटक करण्यात आली, या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता

सध्या सोशल मीडियावर झोमॅटोमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हिडिओ नवी मुंबईतला आहे. या व्हिडिओमध्ये झोमॅटोमध्ये काम करणारी ही मुलगी वाहतूक पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसते आहे. हा व्हिडिओ मुंबई पोलिसांपर्यंत पोहचला आणि त्यानंतर या मुलीला अटक करण्यात आली आहे. प्रियंका मोगरे असे या झोमॅटोमध्ये डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करणाऱ्या मुलीचे नाव आहे. प्रियंका वरळी येथे वास्तव्यास आहे.

8 ऑगस्ट रोजी ती नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी सेक्टर नऊमध्ये गेली असता या मुलीने तिचे वाहन शिस्त मोडून उभे केले होते. ज्यानंतर मोहन सलगर यांनी कारवाई करण्याच्या हेतूने या वाहनाचा फोटो काढला. या फोटोत वाहनाच्या बाजूला प्रियंकाही उभी होती. त्यामुळे तुम्ही माझाच फोटो का काढलात? असे तावातावाने विचारत प्रियंकाने पोलिसांना आणि तिथे असलेल्या महिला पोलिसांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे सुरु केले. वाहन अडवता आले नाही तर फोटो काढल्यास त्या वाहनाच्या क्रमांकावरुन संबंधित शिस्त मोडणाऱ्या व्यक्तीचे सगळे तपशील मिळतात आणि घरी दंडाची पावती पाठवली जाते. याच पद्धतीचा अवलंब सलगर यांनी केला होता. मात्र त्या फोटोबाबत पूर्ण माहिती न घेता आणि काहीही ऐकून न घेता प्रियंकाने सलगर आणि इतर कर्मचाऱ्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली.

यासंदर्भातला व्हिडिओ टोईंग व्हॅनवर काम करणाऱ्या एका कामगाराने त्याच्या मोबाईलमध्ये काढला आणि व्हायरल केला. जो इतका व्हायरल झाला की त्याची दखल मुंबई पोलिसांनीही घेतली. सुरुवातीला नवी मुंबई पोलिसांनी झोमॅटोतल्या मुलीच्या रागाकडे आणि शिवीगाळ करण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र मुंबई पोलिसांनीही या मुलीवर कारवाई करा असे सांगितल्यावर मोहन सलगर यांनी यासंदर्भातली तक्रार केली. त्यानंतर झोमॅटोशी संपर्क करण्यात आला. या मुलीचे नाव, इतर सगळे तपशील पोलिसांनी शोधले. तसेच घडला प्रकारही झोमॅटोच्या अधिकाऱ्यांना दाखवला. त्यानंतर दोन तासांपूर्वी प्रियंका मोगरेला वाशी येथील सेक्टर 17 या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, लुटीच्या दृष्टीने अंगावर धावून जाणे, पोलीस हुकूम न मानणे, सरकारी कामात व्यत्यय आणणे या गुन्ह्यांची कलमं या मुलीवर लावण्यात आली आहेत. दोन तासांपूर्वी या मुलीला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2019 8:34 pm

Web Title: navi mumbai police arrested zomato girl who abused theme on august 8 scj 81
Next Stories
1 आठ दिवसांत पदपथ मोकळे करा
2 पनवेलच्या विकासासाठी दहा हजार कोटींची गरज
3 वाशी रुग्णालयावरील ताण कमी होणार
Just Now!
X