बलकवडी (ता. वाई) धरणाच्या जलाशयात बुडून बहीण भावाचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. महेंद्र किसन वाडकर (वय ३३, रा. वयगाव, ता. वाई, सध्या रा. वाशी नवी मुंबई) व अर्चना संतोष चिकणे (वय ३२ रा. जांभळी, ता. वाई, सध्या रा.नेरूळ, नवी मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

मुंबई येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले कुटुंबीय शुक्रवारच्या वाईतील नातेवाईकांच्या विवाहासाठी दोन दिवसांपूर्वी गावी आले होते. आज (शनिवार) सायंकाळी सहाच्या सुमारास बलकवडी धरण परिसरात फिरण्यासाठी ते गेले. त्यावेळी अर्चनाची दोन वर्षांची मुलगी खेळताना पाण्यात पडली. तिला काढण्यासाठी अर्चना गेली असता पाय घसरुन ती जलाशयात पडली. आपल्या धाकट्या बहिणीला व भाचीला वाचविण्यासाठी महेंद्र पाण्यात उतरला. त्याने छोट्या भाचीला पाण्याबाहेर काढले. ती सुखरूप आहे. मात्र त्याचवेळी अर्चनाने महेंद्रच्या गळ्यास मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. गावातील तरुणांनी दोघांना पाण्याबाहेर काढून वाईच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

अर्चनाच्या मागे पती व दोन मुले असा परिवार आहे. महेंद्रचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या मागे पत्नी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत वाई पोलीस ठाण्यात सुरू होते.