राज्यभरात धुळवडीचा उत्साह बघायला मिळाला. तरुणांसह बच्चे कंपनीनं रंगाची उधळण करत धमाल केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. विशेषतः अनेक राजकीय नेत्यांनी धुळवडीच्या कार्यक्रमांना टाळलं. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील आदिवासींसोबत धुळवड साजरी केली.

मेळघाटातील आदिवासी समुदायातील नागरिकांसोबत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी धुलिवंदनाचा आनंद घेतला. यावेळी नवनीत राणा यांनी आदिवासींचं प्रसिद्ध कोरकू नृत्य केलं. त्यांचा नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात खासदार नवनीत राणा आदिवासी महिलांसोबत नृत्य करताना दिसत आहे.

राज्याच्या सर्वच भागात धुळीची धूम दिसून आली. अनेक भागात पारंपरिक पद्धतीनं धुळवड साजरी करण्यात आली. तर काही ठिकाणी गालबोटही लागलं.

पुण्यात राडा-

चतुःशृंगी परिसरात दोन गटांमध्ये धुळवड खेळत असताना काही वादाची ठिणगी पडली. नेमकं कोणत्या गोष्टीवरुन हे भांडण झालं हे कारण समजू शकलं नाही. मात्र यानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.