मोहन अटाळकर

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा या विजयी झाल्यावर भाजपमध्ये तर जाणार नाहीत ना, अशी शंका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना भेडसावत होती. सुरुवातीला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आघाडीसोबत राहणार असल्याचे वचन नवनीत राणा यांनी दिले होते. पण निवडून आल्यानंतर लगेचच त्यांनी भाजप सरकारला समर्थन दिले. राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यायला हवे, असे वक्तव्य केले आणि त्याची चर्चा झाली. नवनीत राणा कोण? त्या काय आता राष्ट्रवादी काँग्रेसची व्यूहनीती ठरवणार काय? असा प्रतिप्रश्न करून शरद पवार यांनी त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देण्याचे टाळले खरे, पण तेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अडचणीत आणण्याची संधी नवनीत राणा यांनी सोडलेली नाही.

नवनीत राणा यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. अभिनेत्री म्हणून असलेले वलय आणि महिलांमध्ये थेट मिसळून त्यांच्याशी हितगूज साधण्याची शैली, याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी पुन्हा त्या २०१९ च्या निवडणुकीला सामोऱ्या गेल्या. भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण भाजप-शिवसेना युतीत अमरावतीची जागा सेनेकडे असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याऐवजी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवला होता. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा त्यांनी पराभव केला होता.

केंद्रात भाजपच्या सत्ता स्थापनेनंतर नवनीत राणा यांनी पती आणि आमदार रवी राणा यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट, राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळी फडणवीस यांना दिलेला उघड पाठिंबा यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अस्वस्थ होत गेले,  पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे का, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नवनीत राणा यांनी  दिले नाही. शरद पवार आणि अजित पवार यांचा आम्ही आदर करतो, असे त्या म्हणतात. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.

करोना संकटाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी लोकसभेत केली आणि त्याचे लगेच पडसादही उमटले. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा निवडून आल्या, त्यांच्यात विरोधात थेट मैदानात उतरणे, हे अनेकांना रुचले नाही. आता त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ शोधण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यांना भाजपशी जवळीक वाढवून पुढील निवडणूक लढण्यासाठी साखरपेरणी करायची आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवून निवडणूक लढले. पण इतरांनी स्वत:चे घर बदलून विरोधी पक्षासोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून महाआघाडी स्थापन केली. त्याविषयी त्यांना विचारले पाहिजे. करोना संकट काळात ज्या पद्धतीने सरकारचा कारभार सुरू आहे, त्यातून महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यामुळे आपण राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

– नवनीत राणा, खासदार, अमरावती</p>

नवनीत राणा यांना प्रसिद्धीची ओढ लागली आहे. लोकसभा निवडणुकीत त्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आल्या. पण लगेच त्यांनी रंग बदलला. गेल्या सहा महिन्यात करोना काळात त्यांचे काम शून्य आहे. सरकारचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. काही लोकांनी सोंग घेतले असेल, तर त्यांना चांगली कामे कशी दिसणार हा प्रश्न आहे.

– यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती