नवरात्रोत्सवा निमित्त प्रतापगड ३५८ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. या गडावरील मंदिराला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मागील आठ वर्षापासून नवरात्रीत चतुर्थीला मशाली पेटविल्या जातात.

चतुर्थीच्या दिवशी शुक्रवारी रात्री प्रतापगडावरील भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात “जय भवानी –जय शिवाजी ,छत्रपती शिवाजी महाराज कि जय ” च्या जय घोषात एक एक करत ३५८ मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. हा कार्यक्रम मध्यरात्री उशिरा पर्यंत सुरु होता.

मशाली प्रज्वलित झाल्यानंतर प्रतापगडावर रंगी बेरंगी आकर्षक फटाके फोडण्यात आले. यावेळी नगारे, तुतारी, सनई, प्रतापगडावरील स्वराज्य ढोल ताशा पथक ,लेझीम,व भगवे झेंडे फडकावत ३५८ मशाली पेटवून दिपोत्स्त्व साजरा करण्यात आला .

प्रतापगडावरील भवानी माता मंदिराला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मशाली प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. यानंतर मागील आठ वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे. दर वर्षी एक मशाल वाढवून हा उत्सव सुरु ठेवण्यात येणार आहे. मशाली पेटवून प्रतापगडावर नवरात्रात दीपोत्सव साजरा करण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त प्रतापगडावर आले होते .मोठ्या उत्साहात सर्वांनी दीपोत्सवाचा आनंद लुटला.