उद्या मंगळवारपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव, त्यापाठोपाठ मोहरम उत्सव, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन वर्धापनदिन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्वजसंचलन इत्यादी कार्यक्रम आल्यामुळे पोलीस यंत्रणेवर जादा ताण पडला आहे.
सोलापुरात गणेशोत्सवापेक्षा अधिक प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. उद्या मंगळवारपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. सुमारे सातशे सार्वजनिक मंडळांनी वाजत गाजत शक्तिदेवी मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण केली आहे. प्रमुख रस्त्यावरून शक्तिदेवी मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका निघणार आहेत. या धार्मिक उत्सवात महिलांचा सहभाग उल्लेखनीय असतो. विशेषत रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान महिला भाविक श्री रुपाभवानी मंदिरात दर्शनासाठी जातात. त्यामुळे रस्त्यांवर रात्रभर पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. नऊ दिवस हा बंदोबस्ताचा ताण सहन करीत असतानाच येत्या १५ तारखेपासून मोहरम उत्सवास सुरुवात होत आहे. मोहरममध्ये सुमारे २५० सवारी, डोले, ताबुतांची प्रतिष्ठापना होते. मोहरमचा मुख्य उत्सव २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी, सहा दिवस मिरवणुका निघणार आहेत. मोहरमच्या आठव्या दिवशी (२२ आक्टोबर) दसरा साजरा होत आहे. दसरा दिवशीच धम्मचक्र प्रवर्तन वर्धापनदिनानिमित्तआंबेडकरी समाजाची भव्य मिरवणूक निघणार आहे. याच दिवशी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शस्त्रपूजन तथा ध्वजसंचलनाचे आयोजन केले जाते.