News Flash

पालघरमधील नौदल अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

सैनिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याने हे प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेत आलं होतं

भारतीय नौदलातील एका अधिकार्‍याचा पालघर जिल्ह्यातील वेवजी तलासरी येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. सैनिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याने हे प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेत आलं होतं. मात्र तपासादरम्यान हे सर्व प्रकरण अपहरण व खंडणीचे नसून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याच्या निष्कर्षाजवळ पालघर पोलीस पोहोचले आहेत.

५ जानेवारी रोजी सूरजकुमार दुबे या नौदलातील सैनिकाला तलासरी तालुक्यातील वेवजी वैजलपाडा गाव हद्दीतील डोंगराळ जंगलात आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आल्याची माहिती समोर आली होती. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. खंडणीसाठी अपहरण करून मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब अधिकाऱ्याने मृत्यूच्या आधी घोलवड पोलिसांकडे दिला होता. याप्रकरणी पालघर पोलिसांनी डहाणूचे उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दहा पथके तयार करून विविध ठिकाणी तपास केला.

तक्रारीत ३० जानेवारी रोजी चेन्नई विमानतळाच्या बाहेरुन अज्ञात व्यक्तीने आपलं अपहरण केल्याचा उल्लेख होता. मात्र चेन्नई विमानतळ, विमानतळाजवळ असलेल्या एका हॉटेलमधील आणि एका बस स्टॅण्डवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सूरजकुमार दुबे मुक्तपणे वावरत असल्याचे पुरावे प्राप्त झाल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

त्याचप्रमाणे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान या नौदल अधिकाऱ्याने चेन्नई- वेल्लोर प्रवास करून वेल्लोर येथील काही हॉटेलमध्ये एकट्याने अधिवास केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याचप्रमाणे एटीएममधून पैसे काढल्याचे देखील पुरावे पोलिसांकडे आहेत.

शेअर बाजारात सुमारे पावणे अठरा लाख रुपयांची गुंतवणूक केलेला हा अधिकारी पूर्णपणे बुडून गेला होता. त्यांच्यावर ७६ हजार रुपयांचं कर्ज होतं. त्यासाठी त्याने आपले नातेवाईक, मित्र तसंच लग्न ठरल्यानंतर सासऱ्याकडून मोठ्या रकमेचं कर्ज घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शेअर बाजाराच्या व्यवहारासाठी वापरत असलेल्या तिसऱ्या मोबाइलची, शेअर बाजारात गुंतवणूक केल्याची अथवा कर्जबाजारी झाल्याची कोणत्याही नातेवाईकाला माहिती दिली नसल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे.

मृत अधिकाऱ्याने आपल्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, ४ फेब्रुवारीच्या रात्रीत एका वाहनातून आपल्याला चेन्नईहून तलासरी येथे आणण्यात आलं असं नमूद केलं असलं तरी १५०० किलोमीटरचा प्रवास करण्यास किमान २५ ते २६ तास लागत असल्याने प्रत्यक्ष तपासामध्ये पुढे आलेल्या माहितीमध्ये मोठी तफावत असल्याचं दिसून आलं. महिनाभराच्या सुट्टीसाठी आलेल्या या अधिकाऱ्याने १३ बँकांमध्ये मोठ्या रकमेच्या कर्जासाठी चौकशी केल्याची ‘सिबिल’ कडून माहिती प्राप्त झाली आहे. शेअर बाजारात झालेला तोटा व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याच्या दिशने तपासाची दिशा सरकली आहे. तलासरी नाक्यावर असलेल्या पेट्रोल पंपावरून ५ फेब्रुवारीच्या पहाटे एका व्यक्तीने दोन प्लास्टिक बाटल्यांमध्ये डिझेल घेतल्याचं सीसीटीव्ही प्राप्त झालं असून त्याची प्रतिमा मृत अधिकाऱ्याशी मिळत आहे. त्यामुळे खंडणी व अपहरणाच्या दिशेने सुरु असलेला तपास आत्महत्याकडे वळल्याचे प्राथमिक निष्कर्षातून पुढे आल्याचे पालघर पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 5:33 pm

Web Title: navy officer suraj kumar dubey burnt in palghar not abducted sgy 87
Next Stories
1 Pooja Chavan Case : प्रवीण दरेकरांचे सरकारला १४ सवाल! म्हणाले, ‘जनतेलाही हवीत उत्तरं’!
2 Pooja Chavan: संजय राठोड मुंबईत दाखल; उद्धव ठाकरे काय कारवाई करणार?
3 “महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री ठाकरे बोलणार नाहीत”
Just Now!
X