“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भाजपासोबत ‘डील’ केली. म्हणूनच, NIAने त्यांना आरोपी केलं नाही”, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. “तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री व तत्कालीन गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचं काम केलं. मात्र, जेव्हा NIA आपल्याला केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाली तेव्हा परमबीर सिंह यांनी भाजपासोबत ‘डील’ केली”, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणतात की, “NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की तत्कालीन आयुक्तांनी तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी भाजपाशी डील केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचं काम केलं. भाजपासोबत केलेल्या त्या ‘डील’मुळे NIA ने परमबीर सिंह यांना आरोपी केलेले केलेलं नाही.” त्यापुढे भाजपाला टोला लगावताना नवाब मलिक म्हणाले की, “कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला नाही याचे अधिकार NIA ला असल्याचं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, हे अत्यंत हास्यास्पद आहे.” दरम्यान, राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या या आरोपांवर भाजपाकडून काही प्रत्युत्तर येणार का? याकडे लक्ष आहे.

सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे

परमबीर सिंह यांच्या माध्यमातून अनिल देशमुख यांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आल्याचा आरोप यापूर्वीही नवाब मालिकांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने जे चार्जशीट दाखल केलं आहे त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिले होते असं सायबर एक्स्पर्टने सांगितलं असल्याचा दावा देखील नवाब मलिक यांनी केला आहे.