राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा आहे असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

कुठल्याही मंत्र्यांनी कार्यपद्धतीवर कुठलेही प्रश्न निर्माण केलेले नाही. सरकार एकजुटीने काम करतेय असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

पवारसाहेबांची व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसह लसीकरण, लॉकडाऊन व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. शिवाय पक्षाचे नेते पवारसाहेबांना भेटले की, पवारसाहेब राजकीय परिस्थितीवर मंत्र्यासोबत चर्चा करत राहतात असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

आणखी वाचा- Maharashtra Lockdown: लॉकडाउनसंबंधी विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; म्हणाले….

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन मतांतर असून उघडपणे नाराजी जाहीर करण्यात आली आहे. सरकारमधील काँग्रेसचं स्थान यावरुन विरोधक अनेकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात.

आणखी वाचा- “महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाल मान्य असेल”; पदोन्नती आरक्षणावरुन नितीन राऊतांचे सुतोवाच

राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचं स्थान याविषयी बोलताना नाना पटोलेंनी सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका मांडली होती. “आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”, असं ते यापूर्वी म्हणाले आहेत.

त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रियाही दिली होती. ते म्हणाले, “काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव किंवा अन्य नेते असतील…त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीनं, सहकार्यानेच चाललं आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेलं नाही.”