पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा घेतलेला निर्णय हा ‘तुघलकी फर्मान’ आहे. तुघलकी फर्मानाप्रमाणेच दररोज ‘मोदी फर्मान’ निघतात, अशी टीका करत मोदी फर्मानामुळे सामान्य नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते खासदार नवाब मलिक यांनी केला.
नोटबंदीमुळे देशातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बँका व एटीएममध्ये पैशांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा निर्णय जाहीर झाल्यापासून देशभरात आतापर्यंत २४ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा निर्णय जाहीर करताना मोदी सरकारने सामान्य माणसांचा विचार केला नसल्याचे त्यांनी म्हटले. याबाबतचे टविट केले आहे.
नोटा बदलायला येणाऱ्यांच्या हाताला शाई लावण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केले आहे. मोदीजी ही शाई नोटसाठी आहे की व्होट (मत) साठी आहे, असा सवाल त्यांनी विचारला. सारा देश सध्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. अशावेळी भाजप सरकारने सामान्य नागरिकांची मदत करण्याची गरज आहे. आम्ही काळ्या पैशाचे कधीच समर्थन करत नाही. परंतु ५०० व हजार रूपयांच्या नोटांवर अचानक बंदी घातल्याने सर्वांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.