तेराव्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपाची सरकार स्थापन्याची तयारी आहे का, अशी विचारणा करणारे पत्र शनिवारी राज्यपालांनी पक्षाला पाठवले आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर राजकीय हलचालींना चांगलाच वेग आला आहे. भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात मतदान करेल असे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

सत्तास्थापनेवेळी जर युतीमधील पेच न सुटल्यासभाजपा सरकार पाडण्यासाठी शिवसेना विरोधात मतदान करणार का, हे आम्हाला पाहायचे आहे. तसे झालेच तर नंतर पर्यायी सरकार कसे देता येईल, याचा विचार राष्ट्रवादी करेल, असे नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडे बहुमताचा आकडा आहे की नाही, याची राज्यपालांनी खात्री करून घ्यायला हवी नाहीतर सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार मांडला जाण्याची भीती आहे, असेही मलिक म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बोलावण्यात आली असून या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत, असेही मलिक यांनी सांगितले.

विधानसभेतील सदस्यसंख्येचा आढावा घेतल्यास भाजप १०५ आणि शिवसेना ५६ असे १६१ संख्याबळ होते; पण उभयतांमध्ये सध्या तरी बिनसले. दुसरा पर्याय हा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असा असू शकतो. या तिघांचे संख्याबळ १५४ होते; पण काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर जाण्यास तयार नाही. काँग्रेसने पाठिंबा देण्यास नकार दिल्यास शिवसेना व राष्ट्रवादीचे संख्याबळ होत नाही. तिसरा पर्याय हा भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा. तसे झाल्यास १५९ संख्याबळ होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊ केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-राष्ट्रवादीत चर्चा सुरू असल्याचा उल्लेखही पत्रकार परिषदेत केला होता.