महाराष्ट्रात आणि देशात करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केल्यानं हे घडल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातले लॉकडाउनचे निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. राज्यातल्या करोना रुग्णांच्या घटत चाललेल्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात सध्या दहा जिल्हयांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्हयात निर्बंध आहेत तर काही जिल्ह्यात जास्तच  निर्बंध लागू आहेत. लोकांनी सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केले तर लवकरात लवकर आपण कोरोनातून मुक्त होऊ असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- Unlock : महाराष्ट्रात ५ टप्पे, पण इतर राज्यांनी कसा केलाय अनलॉक? काय आहेत निर्बंध? जाणून घ्या!

जे दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. त्यातील लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर ते दुसर्‍या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

हेही वाचा- Maharashtra Unlock Guidelines : महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये अनलॉक! पण कशी होणार आकडेमोड? वाचा सविस्तर!

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. या पाच टप्प्यांसाठी वेगवेगळे नियम असतील. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असणारे जिल्हे किंवा महानगर पालिका पहिल्या टप्प्यात असतील. या टप्प्यासाठी लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सूट असेल.

पुढे अशाच प्रकारे पाचव्या टप्प्यापर्यंत हे निर्बंध कठोर होत जातील. सध्याच्या घडीला राज्यात एकही जिल्हा किंवा महानगर पालिका पाचव्या टप्प्यात नाही. पाचवा टप्पा हा रेड झोन मानला जाईल.