पोलीस अधिकाऱ्याची बदलीची मागणी

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात चौकशीसाठी बोलाविल्याचा राग येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आपण मानसिक तणावाखाली असून आपली मूळ ठिकाणी (अमरावती) बदली करावी, अशी लेखी मागणी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलीस महासंचालकांसह अधिक्षकांकडे केली आहे. त्यांनी या सर्व घटनाक्रमाची पोलीस ठाण्याच्या वहीत नोंद केली आहे.

विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येनंतर पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलाच शाब्दीक वाद रंगला होता. मलिक यांनी रावलांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांबाबत रावल यांनी नवाब मलिक यांच्याविरुध्द दोंडाईचा पोलीस ठाण्यात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात दोंडाईचा ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी चौकशीकामी मलिक यांना पत्र पाठविले होते. हे पत्र मिळताच मलिक यांनी आम्हास भ्रमणध्वनीवरुन धमकाविले, असा दावा निरीक्षक पाटील, मोरे यांनी केला.

निरीक्षक हेमंत पाटील यांनी महासंचालक, अधिक्षकांना लिहिलेल्या अर्जात न्यायालयाकडून परवानगी घेऊन आम्ही पुढील कार्यवाही सुरु केली. मात्र कामकाजास सुरूवात केल्यापासून मलिक धमकावत असल्याचे त्यांनी पोलिसांच्या नोंद वहीत तसेच अर्जात नमूद केले आहे.