दिल्ली विद्यापीठातील प्रा.जी.एल. साईबाबाच्या अटकेनंतर सुद्धा नक्षलवाद्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील सक्रीयता अजिबात कमी झालेली नसून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नक्षलवाद्यांनी इटलीतील मिलान शहरात दोन दिवसांची परिषद घेतल्याचे आता उघड झाले आहे.
गेल्या तीन दशकांपासून देशात सक्रीय असलेले नक्षलवादी अलिकडच्या काही वर्षांत त्यांच्या हिंसक चळवळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्नरत आहेत. ही चळवळ जनतेचे युद्ध आहे, असे सांगून विविध देशातील फुटीरतावादी संघटनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम नक्षलवाद्यांनी साईबाबावर सोपवले होते. त्यात हा प्राध्यापक बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला अटक केली. तेव्हापासून येथील मध्यवर्ती तुरुंगात असलेल्या साईबाबाचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने सुद्धा सबळ पुराव्याचे कारण देत फेटाळून लावला आहे. तो अटकेत असल्याने आता नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील हालचाली थांबतील, या अपेक्षेला गृहखात्याला या नव्या माहितीमुळे धक्का बसला आहे.  
 साईबाबाला अटक होताच या चळवळीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे काम दिल्लीतीलच एका व्यक्तीला सोपवण्यात आले. त्याने गेल्या वर्षी २७ व २८ सप्टेंबरला इटलीतील मिलानमध्ये आयोजित करण्यात आलेली ही परिषद यशस्वी करून दाखवली. या व्यक्तीची ओळख गुप्तचर यंत्रणांनी नुकतीच पटवली आहे. या परिषदेत ब्राझील, तुर्कस्तान, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, टय़ुनिशिया, नेदरलॅन्ड, ग्रीस, अफगाणिस्तान, आयर्लन्ड, स्पेन, कॅनडातील फुटीरतावादी संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी जमलेल्या प्रतिनिधींनी भारतातील ग्रीनहंट मोहिमेचा निषेध केला, तसेच ही मंोहीम जनतेविरुद्ध कशी आहे, हे जागतिक पातळीवर सांगण्याचा निर्धार केला. भारतातील नक्षलवादी चळवळीला बळ मिळावे म्हणून वसाहतवादी देशातील कामगार व भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कामगारांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. नक्षलवाद्यांच्या या कथित जनतेच्या लढय़ात कामगार सहभागी झाल्याशिवाय त्याला व्यापक व जागतिक स्वरूप येणार नाही, असा ठराव या परिषदेत संमत करण्यात आला. देशातील विविध तुरुंगात असलेल्या नक्षलवाद्यांना राजकीय कैदी संबोधून त्यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावगट तयार करण्याचे यावेळी ठरवण्यात आले, तसेच क्रांतीची कल्पना मध्यवर्ती ठेवून नक्षलवाद्यांच्या लढय़ाला पर्यायी राजकारणाचे स्वरूप कसे देता येईल, यावर यावेळी विचार करण्यात आला, तसेच हा विचार कृतीत आणण्यासाठी सर्व संघटनांचे एक शिष्टमंडळ भारतात पाठवण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. या परिषदेशी संबंधित सर्व कागदपत्रे आता गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली असून त्यात
सहभागी झालेल्यांच्या नावांची खातरजमा करण्याचे काम या
यंत्रणेने सध्या हाती घेतले आहे. साईबाबाची अटक सुद्धा आमची जागतिक पातळीवरील सक्रीयता रोखू शकणार नाही, असा इशाराच नक्षलवाद्यांनी या परिषदेच्या माध्यमातून दिल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पुणे कनेक्शन?
साईबाबाच्या गैरहजेरीत या चळवळीचा आंतरराष्ट्रीय विभाग सांभाळणाऱ्या व्यक्तीला सध्या पुण्यात राहून शिक्षण घेणारी एक विदेशी महिला मदत करीत असल्याचे गुप्तचर यंत्रणांना आढळून आले आहे. या महिलेवर पाळत ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दिली.