गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून जाळपोळीचे सत्र सुरु असतानाच गुरुवारी नक्षलींनी एटापल्ली तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर लावल्याचे समोर आले आहे. नक्षलींनी १९ मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले असून महिला नक्षली रामको नरोटे आणि शिल्पा दुर्वा या दोघींचा बनावट चकमकीत खात्मा करण्यात आल्याचा दावाही या बॅनरमधून करण्यात आला आहे.

एटापल्ली- गुरुपल्लीदरम्यान नक्षलींनी गुरुवारी अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत. हिंदी, मराठी आणि माडीया या तीन भाषांमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहे. यात महिला नक्षली रामको नरोटो आणि शिल्पा दुर्वा या दोघांना सी – ६० जवानांनी खोटी चकमक दाखवून ठार केल्याचा दावाही करण्यात आला आहे. या दोघींना पोलिसांनी अटक करुन जंगलात नेले आणि तिथे दोघींना ठार मारण्यात आले, असेही बॅनरमध्ये म्हटले आहे.  जांभिया येथील समाज मंदिरात तसेच आश्रमशाळेजवळही नक्षलींनी बॅनर लावले होते. सरकार आणि पोलिसांचा या बॅनरमधून विरोध करण्यात आला आहे.

कोण आहे रामको?

उत्तर गडचिरोली विभागाची संपूर्ण सूत्रे ही नक्षली नेता भास्कर याच्याकडे आहे, तर त्याची पत्नी दक्षिण गडचिरोलीची नेता होती. मात्र २७ एप्रिलच्या चकमकीत भास्करची पत्नी रामको ठार झाली. यामुळे भास्कर चांगलाच संतापला होता. याच संतापाच्या भरात त्याने हा भूसुरुंगस्फोटाचा कट रचला असावा, अशीही चर्चा या भागात आहे. भास्करने पत्नीचा बदला घेतला, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात आहे.