करोनाच्या टाळेबंदीत नक्षल्यांनी एकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसह शेताच्या शिवारात मोहाची फुले वेचण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गडचिरोलीजवळच्या कोहका-मोकासा गावाजवळ ही घटना घडली. जिवता गणपत रामटेके असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी पोलिसांचा खबऱ्या आहे असे समजून नक्षल्यांनी या शेतकऱ्याला ठार केलं.

तर नक्षलवाद्यांनी अतिदुर्गम भागात रस्ता कंत्राटदारांच्या सात वाहनांची जाळपोळ करून टाळेबंदीत हिंसाचार घडवून आणला.
कोटगुल येथील जिवता रामटेके हा पत्नी नीलम हिच्यासह आज पहाटे कोहका-मोकासा येथील शेत शिवारात मोहाची फुले वेचण्यासाठी गेला होता. तिथे एक नक्षल महिला मोहाची फुले वेचत होती. तिने जिवता रामटेची पत्नी नीलम हिला तिच्या पतीचे नाव विचारले. काही क्षणातच दोन नक्षलवादी तेथे आले. त्यांनी नीलमला पकडून ठेवले आणि दुसऱ्या नक्षल्यांनी जिवता याला दोनशे मीटर अंतरावर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. मात्र, आपला पती जिवंत असल्याचे लक्षात येताच नीलमने कोटगूल हे गाव गाठून तेथील रुग्णवाहिका घटनास्थळी नेली. जिवताला कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु तेथे उपचार न झाल्याने त्यास कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु वाटेतच जिवता रामटेके याने प्राण सोडला.

जिवता रामटेके यास एक मुलगा व दोन मुली असून, येत्या २६ एप्रिलला मनिषा नामक मुलीचे लग्न नियोजित होते. यामुळे रामटेके कुटुंबावर आघात झाला आहे. घटनेचा तपास कोरची पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलिस मदत केंद्राचे अधिकारी राऊत करीत आहेत. चालू आठवड्यात नक्षलवाद्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन केलेली ही दुसरी हत्या आहे. यामुळे तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.

लॉकडाउन असल्याने संपूर्ण रहदारी बंद करण्यात आली आहे. या परिस्थितीत दुर्गम आणि अतिदुर्गम भागात कंत्राटदारांना काम बंद करण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले होते. मात्र अशाही परिस्थितीत दुर्गम भागात काम सुरू ठेवल्याने नक्षल्यांना एक प्रकारची संधी मिळाली आहे आणि याच संधीचा फायदा घेत काल मध्यरात्री कमलापूर ते लींगमपल्ली रस्त्यावरील पुलाच्या कामावरील दोन ट्रॅक्टर आणि मिक्सर मशीन जाळपोळ केली. या घटनेने या परिसरात पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे कुमक रवाना केली असुन त्या भागात नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.