गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या कुंडूरवाहीच्या जंगलात महिला नक्षलवादी रामको नारोटीसह शिल्पा ध्रुवा या दोघींचा चकमकीत मृत्यू झाला. खरंतर कुंडूरवाहीच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. हा हल्ला परतवून लावताना जी चकमक झाली त्या गोळीबारात या दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला यश आले आहे. भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रातंर्गत येणाऱ्या कुंडूरवाही गावाजवळ नक्षलवादी दबा धरून बसले होते. त्यांनी पोलिसांवर हल्ला करताच पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

घातपाताच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी घटनास्थळी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. पोलीस दलाकडून चोख प्रत्युत्तर दिले गेल्याने नक्षलवाद्यांनी पळ काढला. मात्र या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. कुख्यात नक्षली रामको नरोटी आणि भामरागड दलम सदस्य शिल्पा ध्रुवा या दोघींचा या चकमकीत मृत्यू झाला.

रामको नरोटीवर १२ लाखांचे बक्षीस होते. तसेच सुमारे ५० पेक्षा जास्त हिंसक कारवायांमध्ये तिचा सहभाग होता. हेलिकॉप्टरने दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह जिल्हा मुख्यालयी रवाना करण्यात आले अशीही माहिती समोर आली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.