नक्षलवाद्यांच्या क्रांतिकारी विचाराने झपाटलेल्या गोपी-शामको यांची प्रेमकथा गडचिरोलीच्या रक्तरंजित जंगलात फुलली. मात्र, नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य व महाराष्ट्राचा सचिव मिलिंद तेलतुंबडे या प्रेमकथेतील खलनायक झाला. त्याच्या चुकीमुळेच शामको पोलिस चकमकीत मारली गेली आणि अध्र्या वरती डाव मोडल्याने ही अधुरी एक प्रेमकहाणी ठरली. नक्षल चळवळीत प्रेमभावनेला जागा नसेल आणि केवळ रक्तरंजित क्रांती व निरपराध्यांनाच ठार मारायचे असेल तर ती चळवळ काय कामाची? हा प्रश्न पडला आहे सलग १५ वष्रे या चळवळीत काम करणाऱ्या जहाल गोपी या आत्मसमर्पित नक्षलवादी कमांडरला!
कधी काळी या रक्तक्रांतीविषयी प्रचंड आदर, प्रेम व प्रसंगी प्राणाची आहुती देण्याची तयारी असलेल्या गोपीच्या मनात आज या चळवळीविषयी प्रचंड घृणा आहे. प्रेम हे मूल्य मान्य नसलेल्या या चळवळीला आपण आत्मसातच केले कसे, विचारामुळे तो प्रचंड अस्वस्थ झाला आहे. हीच अस्वस्थता त्याने कथन केली. गडचिरोली, गोंदियासह छत्तीसगडच्या सीमा भागात अनेक वर्षांंपासून सक्रीय असलेल्या गोपी उर्फ निरंगसाय मडावीने कुरखेडा तालुक्यातील सावरगावजवळच्या जंगलात नुकतेच आत्मसमर्पण केले. तो मूळ कोरची तालुक्यातील असून २००२ मध्ये त्याने या चळवळीत प्रवेश केला. सुरुवातीला दलम सदस्य असलेल्या गोपीने हळुहळू वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. हिंसक कारवायांमध्ये अत्यंत निपूण व दिलेली जबाबदारी न चुकता पार पाडीत असल्यामुळे त्याला दलम कमांडर आणि विभागीय समितीचा सदस्यही करण्यात आले. विवाहित असलेल्या गोपीची चळवळीतील शामको उर्फ शांता कोरचा हिच्यासोबत ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे त्याचे चळवळीतील कारवायांवर लक्ष लागेना. याची माहिती वरिष्ठांना झाल्याने गोपीवर पाळत ठेवण्यास सुरुवात झाली. त्याचे एकेकाळचे सहकारीच त्याच्यावर संशय घेऊ लागले.
याबाबत नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य व महाराष्ट्राचा सचिव मिलिंद तेलतुंबडे याने गडचिरोली-गोंदियाचा विभागीय कमांडर पहाडसिंग उर्फ कुमारसाय कतलामी याला या प्रेम प्रकरणाबद्दल २८ जून २०१३ रोजी पत्र लिहिले. ते नेमके पोलिसांच्या हाती लागले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, अखेर गोपी आणि शामकोला वेगळे ठेवण्यात येऊ लागले. त्यामुळे दोघांच्याही मनात नक्षल चळवळीविषयी प्रचंड चीड निर्माण झाली. त्यातच १७ फेब्रुवारी २०१४ रोजी गडचिरोली-गोंदिया सीमेवर कोरची तालुक्यातील बेदकाठी येथील पोलिस चकमकीत शामको मारली गेल्याने गोपी पूर्णपणे हतबल झाला. एकीकडे प्रेयसी गेली आणि दुसरीकडे वरिष्ठांच्या त्रासामुळे कसे जगायचे, याचा विचार तो करू लागला. यातून मुक्त होण्यासाठी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, या निर्णयावर तो आला. आत्मसमर्पण योजनेबद्दल त्याला माहिती होती. त्याची ही मानसिकता ओळखून पोलिसांनी एका मध्यस्थामार्फत गोपीवर दबाव वाढविला. अखेर यात यश आले आणि गोपीने ११ नोव्हेंबर २०१४ रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले तेव्हा तो तापाने चांगलाच फणफणलेला होता. वैद्यकीय उपचारानंतर तो आता बरा झाला असून पोलिसांना सहकार्य करीत आहे. या चळवळीत केवळ दिशाभूल होत असून अंतर्गत वादामुळे अनेक नक्षलवादी वरिष्ठांच्या नेहमीच्याच त्रासाला कंटाळले असून तेही आत्मसमर्पणाच्या मार्गावर आहेत. त्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीने केले आहे.