19 September 2020

News Flash

सापळा रचून नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत तिहेरी हत्याकांड

नक्षलवाद्यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतरही ‘खंडणी घ्या, पण खाणीचे काम सुरू करू द्या’, असा आग्रह धरणाऱ्या लॉयड मेटल्सच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नक्षलवाद्यांनी अतिशय पद्धतशीर सापळा रचून

| June 15, 2013 04:20 am

नक्षलवाद्यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतरही ‘खंडणी घ्या, पण खाणीचे काम सुरू करू द्या’, असा आग्रह धरणाऱ्या लॉयड मेटल्सच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नक्षलवाद्यांनी अतिशय पद्धतशीर सापळा रचून ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षल चळवळीत सक्रिय असलेला दक्षिण गडचिरोलीचा विभागीय सचिव ऐतू याने हे तिहेरी हत्याकांड घडवून आणल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड गावाजवळ लोहखनिजाच्या खाणीचा परवानगी मिळालेल्या लॉयड मेटल्स या कंपनीचे उपाध्यक्ष जसपालसिंग धिल्लन, हेमलता मिनरल्सचे संचालक मल्लिकार्जुन रेड्डी व पोलीस पाटील राजू सडमेक या तिघांची नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री गोळय़ा घालून हत्या केली. या हत्याकांडामागील घटनाक्रम आता स्पष्ट होत आहे. नक्षलवाद्यांशी तडजोड करून कोणत्याही स्थितीत खाण सुरू करून दाखवेन, अशी भाषा करणाऱ्या धिल्लन यांनी गेल्या तीन महिन्यांपासून नक्षलवाद्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यासाठी त्यांनी पोलीस पाटील राजू सडमेक यांना मध्यस्थ नेमले होते. ‘खाण झाली, तर गावातील तरुणांना रोजगार देऊ,’ असे आश्वासन कंपनीच्या वतीने सडमेक यांना देण्यात आले होते.
गेल्या आठ दिवसांत सडमेक यांच्या पुढाकाराने धिल्लन व रेड्डी यांच्या नक्षलवाद्यांबरोबर तीन बैठका सूरजागड परिसरात झाल्या. या तीनही बैठकांमध्ये नक्षलवाद्यांनी कोणत्याही स्थितीत खाण सुरू करू दिली जाणार नाही, अशी भूमिका घेतली. अधिकाऱ्यांनी मात्र ‘पाहिजे तेवढी खंडणी घ्या, पण काम सुरू करू द्या,’ असा आग्रह प्रत्येक बैठकीत धरला. तीनपैकी एका बैठकीला नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली विभागाचा सचिव ऐतू हजर होता. त्यानेसुद्धा केवळ इथेच नाही तर संपूर्ण देशातील खनिज उत्खननाला चळवळीचा विरोध आहे, असे या अधिकाऱ्यांजवळ स्पष्ट केले. तरीही धिल्लन व रेड्डी यांनी खंडणीच्या आमिषाला नक्षलवादी बळी पडतील या आशेने प्रयत्न सुरूच ठेवले होते.
नकार दिल्यानंतरसुद्धा हे अधिकारी ऐकायला तयार नाहीत हे बघून नक्षलवाद्यांनी चार दिवसांपूर्वी सापळा रचला. गेल्या मंगळवारी सूरजागडपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या लेंडेर गावात एक लग्न होते. या लग्नाला नक्षलवादी मोठय़ा संख्येत हजर होते. याच लग्नासाठी सूरजागडचे पोलीस पाटील राजू सडमेकसुद्धा आले होते. नक्षलवाद्यांनी त्यांना लग्नाच्या ठिकाणाहून उचलले व त्यांना जंगलात घेऊन गेले. या अपहरणानंतर नक्षलवाद्यांनी लग्नाला हजर असलेल्या सूरजागडच्या काही गावकऱ्यांमार्फत निरोप देत या दोन अधिकाऱ्यांना बुधवारी सायंकाळी भेटीसाठी बोलावले. सडमेक आमच्या ताब्यात आहेत याची कल्पना या अधिकाऱ्यांना देऊ नका, अशी तंबी निरोपाची जबाबदारी सोपवलेल्या गावकऱ्यांना नक्षलवाद्यांकडून देण्यात आली. हा निरोप मिळताच काही तरी सकारात्मक घडत आहे, असा समज झाल्याने दोन्ही अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी तातडीने सूरजागड गाठले. गावाजवळच तळ ठोकून बसलेल्या नक्षलवाद्यांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे दोन तास जंगलात फिरवले. नंतर रात्री नऊच्या सुमारास या दोघांसह पोलीस पाटलाचीसुद्धा हत्या करण्यात आली. जहाल नक्षलवादी ऐतूच्या आदेशावरूनच या तिघांना ठार करण्यात आले, अशी माहिती गुप्तचर सूत्रांकडून मिळाली आहे.

एक कोटीची रोकड गायब
नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी जातांना धिल्लन व रेड्डी यांनी सुमारे एक कोटी रुपयांची खंडणीची रक्कम घेतली होती. कंपनीचे वाहन सोडून दुचाकीवरून जंगलात फरारी होणाऱ्या दोघा नक्षलवाद्यांजवळ सुटकेस होती. सुटकेसमधील रकमेचे पुढे काय झाले ते अद्याप स्पष्ट झाले नाही. या तिघांच्या मृतदेहाजवळ सुटकेस सापडलेली नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हत्येनंतर ही रोकड पळवली असावी, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 4:20 am

Web Title: naxal planned triple murder at gadchiroli
टॅग Naxal
Next Stories
1 टक्का वाढणार : जुलैत १०१, तर ऑगस्टमध्ये ९६ टक्के सरासरी
2 मुख्यमंत्र्यांची माढय़ात बोटीतून दुष्काळाची पाहणी
3 नांदगावकर यांची याचिकाही औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग
Just Now!
X