१९२ ग्रामपंचायत निवडणूक; ४३२ ग्राम सदस्यांचे पद रिक्त राहणार

नक्षलवाद्यांच्या दहशतीला घाबरू नका, लोकशाही व्यवस्थेवर विश्वास दाखवतानाच मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा पोलीस दल, जिल्हा प्रशासनासोबतच विविध सामाजिक संघटना करत असल्या तरी या जिल्हय़ात त्याचा काही एक परिणाम दिसून येत नसून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १९२ ग्रामपंचायतीत एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल न केल्याने ४३२ ग्राम सदस्यांचे पद रिक्त राहणार आहेत.

एका पाठोपाठ एक जहाल नक्षलवादी आत्मसमर्पण करीत असले तरी गडचिरोली जिल्हय़ात अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या मनातून काही केल्या नक्षलवाद्यांची दहशत व भीती कमी होत नसल्याची बाब पुन्हा एकदा प्रकर्षांने समोर आली आहे. गडचिरोली जिल्हय़ात आज मंगळवारी ग्रामपंचायत निवडणूक व पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये १९२ ग्रामपंचायतीत एकाही उमेदवाराने नामांकन दाखल केलेले नाही.  राज्य निवडणूक आयोगाद्वारे १६ ग्रामपंचायतीत नियमित निवडणूक तसेच २०७ ग्रामपंचायतमध्ये उपनिवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. यासाठी ५ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दिली होती. १६ ग्रामपंचायतमध्ये सरपंचासोबत १३६ पदांसाठी निवडणूक जाहीर केली. मात्र, एकापेक्षा अधिक उमेदवारांनी नामांकन दाखल न केल्यामुळे ४७ सदस्यांना बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले, तर ४२ पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे ही सर्व पदे रिक्त राहणार आहेत. तसेच ४७ पदांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासोबतच २०७ ग्रामपंचायतीच्या ५१९ जागांसाठी उपनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र, त्यातही ३९० जागांसाठी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तर १०५ उमेदवारांची अगोदरच बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे आता केवळ उर्वरित २४ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एकूणच नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे १९२ ग्रामपंचायतीत ४३२ पदे रिक्त राहणार आहेत. तसेच १०६ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. एकूणच या निवडणूक प्रक्रियेवरून आपण अंदाज लावू शकतो की, गडचिरोली या जंगलात नक्षलवाद्यांची दहशत किती आहे. गावातील लोक साधी निवडणूक लढण्यासाठी सुद्धा समोर येत नाहीत. नक्षलवादी सांगतील तोच उमेदवार येथे नामांकन अर्ज भरतो. त्यातही नक्षलवाद्यांच्या मनात आले तर ते कुणालाही नामांकन भरू देत नाहीत.