हिंसाचाराच्या शक्यतेने गडचिरोली जिल्ह्य़ात सतर्कतेचे आदेश
गडचिरोली जिल्हा पोलिस दल नक्षलवाद्यांसाठी नवजीवन योजना टप्पा-२ अंतर्गत आत्मसमर्पण पंधरवडा साजरा करण्याच्या उद्देशाने जंगलात थेट नक्षलवाद्यांच्या घरापर्यंत पोहोचत असतांना नक्षलवाद्यांनी २ डिसेंबरपासून पीएलजीए सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. गडचिरोलीच्या जंगलात ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स व पत्रके वितरित करून या सप्ताहात हिंसाचार घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण गडचिरोली जिल्हा नक्षल्यांच्या हिंसाचारात पोळत असला तरी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी योजनाबध्द पध्दतीने नक्षलवादावर नियंत्रण मिळविल्याने नक्षल्यांना गेल्या एक दीड वर्षांत मोठी कारवाई करता आलेली नाही. नक्षली नेते दर वेळेस नक्षल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करतात. मात्र, नक्षल सप्ताहातही त्यांना अनुचित घटना घडवून आणता येत नाही. हा एकप्रकारे पोलिस दलाचा विजय, तर नक्षल्यांचे अपयश आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस नक्षलवाद्यांच्या थेट घरापर्यंत पोहोचून नवजीवन योजनेचा टप्पा-२ राबवित आहेत. मात्र, नक्षलवादी येत्या २ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाला सुरुवात होत असून त्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स व पत्रके टाकून सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी नक्षलवादी २ ते ८ डिसेंबपर्यंत पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते विध्वंसक कारवाया करतात. सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर नक्षल्यांनी जंगल परिसरात बॅनर्स, पोस्टर्स बांधून व पत्रके टाकून सप्ताह साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
आलापल्ली-रेपनपल्ली मार्गावर आज असे बॅनर्स व पत्रके आढळून आली. त्यात पीएलजीए सप्ताह साजरा करा, हवाईहल्ल्यांचा विरोध करा, सलवा जुडूम-२ चा विरोध करा, असे आवाहन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान विध्वंसक कारवाया होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. नक्षल्यांनी अतिदुर्गम भागात विध्वंसक कारवाया करू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. भामरागड, एटापल्ली, कोरची, धानोरा, अहेरी, सिरोंच्या या सर्वाधिक नक्षलग्रस्त तालुक्यांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
नक्षल्यांच्या या सप्ताहात एस.टी. बस व खासगी वाहनांची ते मोठय़ा प्रमाणात तोडफोड करात असल्याने परिवहन महामंडळाने या कालावधीत अतिदुर्गम भागातील बसफेऱ्या कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वष्रेभरात पोलिस दलाच्या आत्मसमर्पण योजनेला मोठय़ा प्रमाणात यश मिळाल्यामुळे नक्षलवादी चांगलेच संतापलेले आहेत.
त्यामुळे या सप्ताहात कुठली तरी मोठी घटना घडवून आणतील, असा अंदाज आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागातील पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. बुधवार २ ते ८ डिसेंबपर्यंत हा सप्ताह राहणार असून नागरिकांनीही या कालावधीत विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.