गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असे फर्मान नक्षलवाद्यांनी सोडल्याने या सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजीनामा न देणाऱ्यांना एसपीओ रवींद्र सुनकरीसारखी मृत्यूदंड ठोठावला जाईल, असा आदेशच नक्षल्यांनी बॅनरच्या माध्यमातून गाव गावात पोहोचविल्याने नवनियुक्त सरपंच व सदस्यांची पंचाईत झाली आहे.
या जिल्ह्य़ातील अहेरी उपविभागातील अहेरी, भामरागड, एटापल्ली व सिरोंचा या तालुक्यातील ग्रामीण भागात २४ एप्रिल, तर गडचिरोली, धानोरा, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा व कोरची तालुक्यातील ग्रामीण भागात ३० एप्रिलला ३५० ग्रामपंचायतींसाठी नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून तब्बल ८० टक्के मतदान झाले होते. अर्ज भरण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना धमकावल्याने ४३ ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज आला नाही. अशाही परिस्थितीत लोकांनी अर्ज भरून नक्षलवाद्यांचा विरोध झुगारत निवडणूक लढली आणि जिंकलीही. मात्र, आता नक्षल्यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असे फर्मान सोडल्याने या सदस्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. आलापल्ली-सिरोंचा या मुख्य मार्गावरील टेकमपल्ली गावाजवळ आज सकाळी नक्षलवाद्यांचे बॅनर व पोस्टर आढळून आले. या बॅनरवर टेकमपल्ली, पुसूकपल्ली व मलमपल्ली इत्यादी गावातील सरपंच व पंचायत सदस्यांनी तात्काळ आपापले राजीनामे द्यावे अन्यथा, वाईट परिणाम होतील, असा इशारा नक्षलवाद्यांनी दिला आहे.
कोळसेपल्ली येथील रवींद्र सुनकरी हा युवक एसपीओ म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. सुनकरीप्रमाणे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आदेश झुगारला तर त्यालाही तिच शिक्षा केली जाईल, असेही नक्षलींनी म्हटले आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील टेकमपल्ली गावाजवळच्या रस्त्यावर नक्षल्यांचे बॅनर आढळून आल्याने हे सदस्य भयग्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, सध्या नक्षल्यांनी तेंदूपत्ता तोडाईसाठी जाणाऱ्या आदिवासींनाही अशाच प्रकारे धमकी देऊन तेंदू संकलनाच्या कामाला विरोध दर्शविला आहे. तेंदू तोडणाऱ्यांनाही शिक्षा दिली जाईल, असे नक्षल्यांनी ठिकठिकाणी लावलेल्या बॅनर्स व पोस्टर्सच्या माध्यमातून दिसून आले. मात्र, तेंदू संकलन हा थेट पोटाशी निगडीत प्रश्न असल्यामुळे गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांच्या धमकीला भिक घातली नाही. त्याचाच परिणाम की काय, नक्षलवाद्यांनी आता थेट सरपंच व सदस्यांच्या राजीनाम्याचे फर्मान सोडले आहे.