अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा गावात झालेल्या दलित कुटुंबाच्या हत्याकांडावरून राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने केली जात असतानाच या निदर्शनांना नक्षलवाद्यांकडून चिथावणी दिली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या हत्याकांडाचे भांडवल करून राज्यात जातीय दंगली घडवण्याचा कट नक्षलवाद्यांनी आखल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्य़ातील जवखेडा गावात एका दलित कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याने दलित वर्गात सध्या कमालीचा असंतोष आहे. या असंतोषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न आता नक्षलवाद्यांकडून सुरू झाला आहे. जवखेडा हत्याकांडाची माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई, पुण्यातील काही कार्यकर्ते एका सत्यशोधन समितीच्या माध्यमातून या गावात गेले होते. या समितीत काही नक्षलसमर्थकही होते. सध्या मुंबईत सक्रिय असलेल्या या समर्थकांना नक्षलवादी चळवळीत सहभाग असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटकसुद्धा केलेली आहे. या समितीच्या जवखेडा दौऱ्यानंतर या हत्याकांडात ठार झालेल्या तिघांच्या मृतदेहाची बीभत्स स्वरूपातील छायाचित्रे लगेच फेसबुकवर टाकण्यात आली. तणाव वाढवण्यासाठी या छायाचित्रांसोबत प्रक्षोभक प्रतिक्रियाही देण्यात येत आहेत. याची कुणकुण लागताच पोलिसांनी ही छायाचित्रे तात्काळ हटवली.  या हत्याकांडाची छायाचित्रे पोलिसांनी फेसबुकवरून हटवली असली तरी ती नक्षलवाद्यांजवळ उपलब्ध असल्याने वेगवेगळ्या सोशल साइट्सवरून त्याचा चिथावणीसाठी वापर केला जात आहे. जवखेडा हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी होत असलेल्या आंदोलनातसुद्धा नक्षलवाद्यांसाठी शहरी भागात काम करणारे अनेक समर्थक सक्रिय सहभाग नोंदवीत आहेत. या मुद्दय़ावरून राज्यात जातीय तणाव निर्माण करा व दंगली घडवून आणा, असे संदेश या चळवळीच्या म्होरक्यांकडून दिले जात आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
अहमदनगर जिल्ह्य़ातील जवखेडा येथील दलित कुटुंबाच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणाची तातडीने चौकशी करून त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. याप्रकरणी तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. हत्याकांडाचा लवकरात लवकर छडा लावला जाईल व जलदगती न्यायालयात दोषींवरील खटल्याचे कामकाज चालविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मंत्री पंकजा मुंडे या उद्या या गावास भेट देणार असल्याचे एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

जवखेडा हत्याकांडामुळे दलित समाजात संतापाची भावना असणे स्वाभाविक आहे. हा संताप समजून घेता येण्यासारखा आहे. मात्र नक्षलवादी या हत्याकांडाचे भांडवल करून राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर आमचे बारकाईने लक्ष आहे.
– रवींद्र कदम, विशेष पोलीस महानिरीक्षक