केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दावा

चंद्रपूर : पूर्वी एका नक्षलवाद्यामागे दोन पोलीस शहीद व्हायचे. आज केवळ नक्षलवादीच ठार मारले जात आहेत. भौगोलिक सीमा बघता आधी नक्षलवाद्यांचा प्रभाव ३२८ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात होता. आज तो कमी होऊन २९१ पोलीस ठाण्यांपर्यंत मर्यादित झाला आहे. नक्षलवाद्यांच्या कारवायांत सामान्यांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले असून केंद्र सरकारच्या प्रभावी नियोजनामुळे नक्षलवादावर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त झाले आहे, असा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

देशात व राज्यात काँग्रेसची सत्ता असताना नक्षलवाद्यांचा हिंसाचार वाढला होता. सामान्य आदिवासींच्या हत्यासत्रापासून, तर शासकीय मालमत्तेची जाळपोळ, चकमकी, हिंसाचाराच्या घटना यात कमालीची वाढ झाली होती. मात्र, नक्षलवादासारख्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नावर केंद्र सरकारने प्रभावी नियोजन केले. नक्षलवादी कारवायांमध्ये पूर्वी दोन हजार ४१८ सामान्य आदिवासी व इतर लोकांचे बळी जात होते. आज हा आकडा जवळपास १३०० ने कमी झाला असून एक हजार ८१ इतका खाली आला आहे. पूर्वी ४४५ नक्षलवादी एका वर्षांला चकमकीत ठार मारले जायचे. आज हा आकडा ५१० इतका आहे. या सर्वासोबतच नक्षलवादी आत्मसमर्पण योजनेला सर्वाधिक यश मिळाले आहे. कधीकाळी केवळ १३८७ नक्षलवादी वर्षांला आत्मसमर्पण करायचे. आज तीन हजार ३७३ नक्षलवादी वर्षांला आत्मसमर्पण करीत आहेत. यामध्ये जहाल नक्षलवाद्यांचाही समावेश आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या पत्रकार परिषदेला आमदार नाना शामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

पूवरेत्तर राज्यातही शांततेचे प्रयत्न यशस्वी

गडचिरोली जिल्हय़ातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने योजना तयार करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत येथील नक्षलवाद नियंत्रणात आलेला आहे. आणखी थोडा जोर लावण्याची गरज आहे. जिल्हय़ातून नक्षलवाद पूर्णत: हद्दपार व्हावा, त्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत. नक्षलवादासोबतच जम्मू काश्मीर येथे आतंकवादी घटनांमध्येही घट झाली आहे. पूवरेत्तर राज्यातही शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळवले असल्याचेही अहीर यांनी सांगितले.