मुरकूटडोह-दंडारीच्या जंगलातील मोठी कारवाई

गोंदिया जिल्ह्य़ाच्या सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टेकाटोला ते मुरकूटडोह दंडारी या गावाजवळ नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली भूसुरुंग स्फोटके शोधून काढण्यात सी-६० दलातील पोलीस जवांनाना यश आले.

१ जूनला  राबवलेल्या संयुक्त मोहिमेत घातपाताचा हा डाव उधळला गेला. नाल्यावरील पुलाखाली एका जर्मनच्या डब्यात मोठय़ा प्रमाणात ही भूसुरुंग स्फोटके पेरून ठेवली होती. १० किलो क्षमतेच्या या डब्यात चंदेरी रंगाचे दाणेदार स्फोटक  पदार्थ,ज्यात खिळे व काचेचे तुकडे होते. अंदाजे १० किलो वजनाचा एक नग जिलेटीन स्टीक,सुपर पॉवर ९० सोलर १२५ ग्रम, एक नगर ईलेक्ट्रिक डेटानेटर, असे साहित्य जप्त करण्यात आले. ही स्फोटके नक्षलवाद्यांनी पोलीस पथकाचा घात करण्याच्या उद्देशाने पेरून ठेवली होती. याप्रकरणी पोलिसांनी माओवादी संघटनेचा सदस्य सी.सी.एम.मिलिंद ऊर्फ दिलीप तेलतुंबडे, मलाजखंड दलमचा  प्रेम ऊर्फ उमराव गणपत मडावी, तांडा दलमचा नागेश ऊर्फ राजू तुलावी व दर्रेकसा दलमच्या २९ सदस्यांविरुद्ध  विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्य़ाचा तपास सालेकसाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदार नालकुल  हे करीत आहेत. एक महिन्यापूर्वी  १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी मोठा भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यात सी-६० पथकाचे १५ जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर गोंदिया जिल्हा पोलिसांनी जिल्ह्य़ातील सीमावर्ती भागात रेडअलर्ट जारी केला होता. त्यानुसार, शोध मोहीम राबवताना या घातपाताच्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला.

नक्षलग्रस्त भागात जनजागृती मेळावे वाढवणार

गोंदिया जिल्ह्य़ातील दुर्गम भागात असलेल्या सशस्त्र दूरक्षेत्राच्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची केंद्रे सुरू केली. पहिल्या वर्षी त्यात २५० मुलांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे आदिवासी तरुण-तरुणींना आता शिक्षणाची आस मोठय़ा प्रमाणात लागली आहे. नक्षलवादग्रस्त अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांसाठी सशस्त्र दूरक्षेत्राच्या ठिकाणी रेशनिंगची सुविध उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामुळे गरजू नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे व नियमित रेशन पोहचण्याचा मानस आहे. यानंतर नक्षलग्रस्त भागात जनजागृती मेळावे वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी पत्रपरिषदेत दिली.