-रवींद्र जुनारकर

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते रामा तलांडी (३७) यांची शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास १० ते १५ नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली. अचानक करण्यात आलेल्या गोळीबारात तलांडी यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतक रामा तलांडी हे बुर्गी ग्रामपंचायतमध्ये १० वर्ष उपसरपंच होते होते. बुर्गी येथे लग्न समारंभ होता. तिथे डीजे लावत असताना साध्या वेशात दहशतवादी आले आणि त्यांनी रामा तलांडी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर नक्षली जंगलात पसार झाले. तर गोळ्या लागून गंभीर जखमी झालेल्या रामा तलांडी यांचा जागेवरच मृत्यू झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी बुर्गी येथे पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते. त्यावेळी रामा तलांडी यांनी फडणवीस यांना रस्ते व मोबाईल टॉवरची मागणी केली होती.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.गडचिरोली जिल्ह्यात मागील महिनाभरात नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना सी-६० पोलीस जवान आणि नक्षलांमध्ये अनेकदा चकमक झाली यात काही नक्षल गंभीर जखमी झाले तर खोब्रामेंढा जंगलात पाच नक्षल ठार झाले दरम्यान काही घटनास्तळावरून नक्षलीसाहित्य सुद्धा जप्त करण्यात आले होते. विशेष म्हणजे नक्सलवाध्यानी रविवार 12 एप्रिल रोजी गडचिरोली बंदचे आवाहन केले आहे.