रवींद्र जुनारकर, कुरखेडा (गडचिरोली)

कुरखेडा हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जागोजागी बॅनर लावत केंद्र व राज्य सरकारला धमकी दिली आहे. उत्तर गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या दादापूर, जांभुळखेडा, लेंडारी नाला येथे शंभराच्यावर कापडी बॅनर लावले आहेत. गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका, असा बॅनरवर मजकूर आहे. या भागातील प्रत्येक गावागावांमध्ये हे बॅनर लावले आहेत.

एप्रिल २०१८ मध्ये कसनसूर येथे ४० नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले होते, याचा  बॅनरवर उल्लेख करत त्याचा निषेध नोंदवला आहे. २७ एप्रिल रोजी डीव्हीसी कॉम्रेड रामको नरोटी हिची पोलिसांनी हत्या केल्याचासुद्धा निषेध केला आहे. बॅनरवर कंत्राटदारालासुद्धा येथे दिसाल तर जीव गमवावा लागेल असा इशारा दिला आहे. तसेच केंद्र व राज्य सरकार अदानी, अंबानी उद्योगपतींसाठीच सरकार काम करत आहे. शासनाने गरीबांना वाऱ्यावर सोडले आहे असे लिहिले आहे.

वाढदिवस अन् निधन वृत्त

हल्ल्यात शहीद झालेले जवान दयानंद सहारे यांचा २ मे रोजी वाढदिवस होता. सहारे यांच्या घरी ४० व्या वाढदिवसाची तयारी पूर्ण होत असतानाच त्यांच्या घरात ही बातमी धडकताच शोककळा पसरली. वाढदिवसाचा उत्साह एकदमच शोककळेत बदलून गेला. दयानंद सहारे यांना पोलीस सेवेत ९ वर्षे पूर्ण झाली होती. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार वर्षांची मुलगी व दीड वर्षांची एक मुलगी असा परिवार आहे.

घटनास्थळाची पाहणी

आज सकाळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शिंदे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस महासंचालक जयस्वाल यांना घटनास्थळापासून ५०० मीटपर्यंत दूर पडलेले शहीद पोलिसांचे छिन्नविछिन्न अवयव पाहावयास मिळाले.

पाचजणांची बदली झाली होती

हल्ल्यात शहीद झालेल्या पाचजणांची जिल्हा बदली झाली होती. मात्र त्यांना मोकळे केले जात नव्हते. यवतमाळ, भंडारा, बुलढाणा येथील हे तरुण पोलीस होते. त्यांना मोकळे केले असते तर त्यांना जीव गमवावा लागला नसता. या हल्ल्यामुळे उत्तर गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या कुरखेडा, पुराडा, दादापूर, जांभुळखेडा, लेंढारी, रामगड या गावात भीती व दहशतीचे वातावरण आहे. लोक काहीही बोलायला तयार नाहीत. आम्हाला स्फोट झाला आणि जवान शहीद झाले याचीच माहिती आहे. याशिवाय दुसरे काहीही माहिती नाही असे लोक सांगतात.

बॉम्बशोध पथकाकडून पाहणी

स्फोट होताच घटनास्थळी पाच बॉम्ब शोध पथक व वाहने दाखल झाली. कुरखेडा ते पुराडा रस्त्याची नाकाबंदी केली. नेमके कोणते व किती विस्फोटक वापरले याचा शोध घेत होते. स्फोटानंतर किमान ५ ते ६ फूट खोल खड्डा पडला आहे. याचाच अर्थ या स्फोटात शक्तिशाली स्फोटके वापरली गेली असावीत. अधिकाऱ्यांनी आज सकाळी संशयास्पद साहित्य जप्त केले आहे. घटना घडली त्यावेळी आजूबाजूच्या गावातच असलेले साध्या वेशातील नक्षलवादी घटनेची माहिती घेत होते.

दादापूरमध्ये स्मशान शांतता

नक्षलवाद्यांनी ३६ वाहनांची जाळपोळ केलेल्या गावात स्मशान शांतता आहे. सर्व घरांचे दरवाजे बंद आहेत. जळालेली वाहने तेथेच पडून आहेत. ९०० लोकसंख्येच्या या गावात आज एक लग्न कार्य होते. मात्र, त्याकडेही ग्रामस्थांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.  दादापूरपासून ३ किलोमीटरवरील पुराडा पोलीस ठाण्याचे पथक २४ तासानंतरही गावात पोहोचले नव्हते.  यासंदर्भात पुराडाचे ठाणेदार महल्ले म्हणाले की, आम्ही सर्व भूसुरुंग स्फोटाकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. मी स्वत: चोवीस तासापासून घटनास्थळी आहे. त्यामुळे दादापूर येथे जाता आले नाही. दादापूर येथील एका महिलेच्या माहितीनुसार अमर कंन्स्ट्रक्शन कंपनीचे प्लान्ट व्यवस्थापक अजितकुमार मिश्रा यांना नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी धमकी दिली होती. मात्र तरीही काम सुरू होते. पुन्हा धमकी दिल्यावर मिश्रा २६ एप्रिल रोजी इथून निघून गेले.