भामरागड तालुक्यातील नारगुंडा, टेकला व ताळगांव मुख्य रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात नक्षली पत्रके मिळाली आहत. या पत्रकांमध्ये नक्षलवाद्यांनी कोया भूमकाल क्रांती सेना व सेना प्रमुखांचा पर्दाफाश करा, असे आवाहन जनतेला केले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून आता राजकीय पक्षांसोबतच स्थाानिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येते.

जिल्हय़ात अनेक सामाजिक संघटना कार्यरत असून मागास भागातील आदिवासी समाज जागृतीचे कार्य केले जाते. मात्र, पहिल्यांदाच संघटनेच्या विरुध्द नक्षली पत्रके मिळाल्याने परिसरात दहशत व भीती पसरली आहे. पत्रकात भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोली असा उल्लेख करण्यात आलेला आहे. कोया भूमकाल क्रांती सेना ही संघटना शोषणकारी व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करीत आहेत. आदिवासींनी या भुलथापांना बळी पडू नये, असे या पत्रकात म्हटले आहे.

केबीकेएसचे प्रमुख संतोष आत्राम यांची दुहेरी धोरणाचा पर्दाफाश करा असेही आवाहन नक्षलवाद्यांनी या पत्रकातून केले आहे. भारतीय संविधानाचे संरक्षक असल्याचा आव केबीकेएसच्या माध्यमातून केला जात असला तरी प्रत्यक्षात आदिवासींची संपत्ती लुटून नेणारा आदिवासी हा देशद्रोही असल्याचे यात म्हटले आहे. केबीकेएसच्या माध्यमातून आदिवासी जनतेची दिशाभूल सुरू असून ग्रामसभेच्या नावावर आदिवासींकडून पैसे वसुली बंद करा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. निसर्ग उपासक आदिवासी समाजाला केबीकेएस ही संघटना मूर्तीपूजेकडे घेऊन चालली आहे. हे निंदनीय असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, नक्षलवाद्यांनी आज केबीकेएस या संघटनेच्या विरोधात ही पत्रकबाजी सुरू केली असली तरी यापूर्वीही नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांना अशाच प्रकारे इशारा दिलेला आहे. भूमकाल या संघटनेच्या विरोधातही नक्षलवाद्यांनी अशाच प्रकारची ओरड सुरू केली होती. त्याच प्रकारे गडचिरोलीत आदिवासींच्या उत्थानासाठी जो कुणी सामाजिक तथा विकासात्मक काम हाती घेतील, त्याच्याविरूध्द नक्षलवादी ओरड सुरू करून त्याचे काम तिथेच बंद पाडत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. आता कोया भूमकाल क्रांती संघटनेच्या विरोधातही नक्षलवादी अशाच प्रकारे ओरड करीत आहेत. त्यातूनच ही पत्रकबाजी सुरू झालेली आहे. एखादी स्वयंसेवी संस्था नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ातील अतिदुर्गम भागात काम करायला गेली तर नक्षलवादी त्यांना जंगलातून पळवून लावतात. विकास कामे करू देत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळेच नक्षलवाद्यांना गडचिरोलीत पाहिजे तसा जनाधार मिळत नसल्याची बाबही समोर आली आहे.