गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या अगदी शेजारच्या विहिरीत जिवंत ग्रेनेड, दारूगोळा, बंदुका व काडतुसे, असा नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी हा साठा विहिरीच्या कपारींमध्ये कसा दडविला, याचा शोध पोलीस दल घेत आहेत.
नक्षलवादग्रस्त गडचिरोलीचे जिल्हा पोलीस मुख्यालय कॉम्प्लेक्स भागात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून तर पोलीस उपमहानिरीक्षक व पोलीस दलाची इतर सर्व कार्यालये कॉम्प्लेक्समध्येच आहेत. पोलीस मुख्यालयाच्या मागच्या बाजूला एक पडित शेत आहे. या शेताचे मालक शेतीची व विहिरीची सहज पाहणी करत असताना त्यांना खोल विहिरीच्या कपारीत काहीतरी दडवून ठेवल्यासारखे दिसले. या वेळी त्यांनी अधिक बारकाईने बघितले असता त्यांना बंदुकीची काडतुसे, दारूगोळा व बंदुकांचा साठा दिसून आला. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ गडचिरोली पोलीस मुख्यालयाला दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी विहिरीची पाहाणी केली असता मोठा शस्त्रसाठा असल्याचे लक्षात आले. या वेळी पोलिसांनी विहिरीतील पूर्ण पाणी उपसून पाहणी केली असता विहिरीच्या कपारी व खोलवर शस्त्रसाठा दडवून ठेवल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, पोलीस मुख्यालयाच्या अगदी मागील विहिरीत हा शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची साधी माहितीही पोलीस दलाला नव्हती. नक्षलवाद्यांनीच हा साठा बऱ्याच काळापासून येथे लपवून ठेवला असावा, अशी चर्चा आहे. मात्र हा शस्त्रसाठा पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या मागे विहिरीत ठेवण्यामागे नक्षलवाद्यांचा उद्देश काय होता, याचा शोध पोलीस दल घेत आहे.

सापडलेला शस्त्रसाठा
*    ७.६२ एम. एम. एसएलआर, एकेएम, इन्सास ३०३, ९ एम.एम.चे ५१३ नग, जिवंत काडतूसे.
*    ७८ नग खालीकेस, प्रोजेक्ट पॅरा सेल
*    पांढरा लाल ४८ नग जिवंत
*    वॉकीटॉकी बॅटरी १
*    ७.६२ एम.एम.एसएलआर मॅगझीन १ नग
*    ५१ एम.एम.मोटार, एचई बॉम्ब केस १ नग
*    डिटोनेटर बॉक्स १ नग,
*    ४४ एम.एम युजिबिएल, २ नग जिवंत ग्रेनेड व इतर दारूगोळा