काही दिवसांपूर्वीच गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात पोलिसांचे 15 जवान शहीद झाले. या घटनेवर अहमदनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रश्न बंदुकीने सुटणार नाही. सरकार नक्षलवाद्यांशी चर्चेसाठी तयार असेल तर आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत असं अण्णा हजारे म्हणाले.

नक्षलवादी काही बाहेरचे नाहीत. ते महाराष्ट्रात जन्मले, महाराष्ट्रातच राहतात. त्यांचे प्रश्न समजून घेऊन सरकारने चर्चेतून मार्ग काढायला हवा. हा प्रश्न बंदुकीने सुटणार नाही. सरकार नक्षलवाद्यांशी चर्चेसाठी तयार असेल तर आपण मध्यस्थी करण्यास तयार आहे. यासाठी सरकारने नक्षलवाद्यांशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या शीघ्र कृती दलावर हल्ला केला. यात 15 जवान शहीद झाले. सी 60 तुकडीचे हे सर्व जवान होते. गस्तीवर जाणाऱ्या जवानांना लक्ष्य करुन नक्षल्यांनी हा हल्ला केला.