नक्षल संघटनेविरुद्ध पोलिसांना माहिती पुरवणाऱ्या २५  जणांची आम्ही हत्या केली, अशी कबुली माओवादी दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा प्रवक्ता विकल्प याने माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

ज्यांची हत्या केली त्यामध्ये १२ गुप्त सैनिक, पाच संघटनेच्या आत राहून पोलिसांना मदत करणारे व इतर आठ संघटनेबाहेरील अशी माणसे ज्यांनी पोलिसांना आमच्याबाबत माहिती पुरवली त्यांचा समावेश आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

माओवादी नेता तथा डीव्हीसी विज्जा मोडियम ऊर्फ बदरू हा जहाल नक्षलवादी पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करीत होता. मागील दोन वर्षांत बदरू याने केवळ पोलिसांसाठीच काम केले व माओवादी संघटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली असा आरोपही या पत्रकात आहे. बस्तरचे आयजी, बिजापूर व दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक यांनी नक्षल्यांविरुद्ध खबऱ्यांचे जाळे निर्माण केल्याचा आरोपही माओवादी दंडकारण्य स्पेशल झोनल समितीच्या या पत्रकात करण्यात आला आहे.

स्वामी अग्निवेश यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त

‘भारत की कम्युनिस्ट पार्टी’च्या (माओवादी) केंद्रीय समितीनेही एक प्रसिद्ध पत्रक काढले आहे. यात स्वामी अग्निवेश यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. स्वामी अग्निवेश यांचे निधन जनवादी, प्रगतीशिल, राष्ट्रीय मुक्ती आंदोलन आणि जनवादी समाजाच्या आंदोलनासाठी मोठे नुकसान असल्याची भावना माओवाद्यांनी व्यक्त केली आहे.