अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीचा जाहीर निषेध नोंदवितांनाच नक्षलवाद्यांनी उपविभाग धानोरामधील गट्टा पोलिस ठाण्यांतर्गत येडमपल्ली ते कोरकुट्टी रस्त्यावर १३ वाहनांची जाळपोळ शुक्रवारी केली. यात सुमारे पाच ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे भारतात आगमन होत आहे. ओबामांचा जाहीर निषेध नोंदवितांनाच नक्षलवाद्यांनी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, तसेच गडचिरोलीत ‘गो बॅक ओबामा’ अशी पोस्टर्स नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी लावली आहेत. ओबामांच्या भारत भेटीचा निषेध म्हणूनच नक्षलवाद्यांनी काल, गुरुवारी सायंकाळी अतिदुर्गम भागातील गट्टा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या येडमपल्ली-कोरकुट्टी रस्त्यावरील १३ वाहनांवर पेट्रोल टाकून जाळले. येडमपल्ली ते कोरकुट्टी या रस्त्याचे कामकाज सरला कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. सायंकाळच्या सुमारास नक्षलवादी येथील कामगार, गाडीचे चालक व अन्य कामगारांना बेदम मारहाण केली. वाहनांची तोडफोड करून ती वाहने जाळली व रस्त्याचे कामकाज बंद पाडले. यात ८ ट्रॅक्टर, २ ट्रक्स, २ जेसीबी व १ रोड रोलरचा समावेश आहे. विशेष म्हणजे वाहने खाक होईपर्यंत नक्षलवादी घटनास्थळीच होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वाहने जळल्यानंतर नक्षलवादी बराक ओबामांचा जाहीर निषेध करीत जंगलात पसार झाले. त्यांचा शोध घेणे व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाला बराक ओबामा प्रमुख पाहुणे असल्याने नक्षलवाद्यांनी याच दिवशी भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या काळात नक्षलवादी हिंसाचार, जाळपोळ व हत्या, सुरूंग स्फोट करण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे.