17 October 2019

News Flash

निमंत्रण रद्द केल्याने महाराष्ट्र संस्कृतीचा अपमान

मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा उद्वेग

लक्ष्मीकांत देशमुख

मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा उद्वेग

प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेणे ही चीड आणणारी गोष्ट आहे. या कृतीने महाराष्ट्राच्या उदारमतवादी संस्कृतीचा अपमान झाला आहे. त्यांच्या भाषणाने भूकंप झाला नसता, असा उद्वेग मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना देशमुख यांनी सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या संयोजक आणि साहित्य महामंडळाच्या कृतीचा निषेध केला. ते म्हणाले, सहगल या कलावंताचा आतला आवाज आहेत. त्यांना सलाम. त्यांना न बोलावणे हे अशोभनीय आहे. अशा प्रकारच्या कृतीने नैतिकतेला काळिमा फासला गेला आहे.

निमंत्रण मागे घेण्याच्या प्रकाराबाबत एकमेकांकडे बोट दाखवणे हेही अयोग्य आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला असला तरी त्याने काही साध्य होणार नाही. ही मोठी चूक आहे. निमंत्रण मागे घेणे ही आपली संस्कृती नाही, असेही देशमुख यांनी सुनावले.

विरोधी पक्ष हा लोकशाहीचा आत्मा असतो, असे लक्षात आणून देत देशमुख म्हणाले, ‘‘आजच्या वातावरणात मोकळेपण नाही. ते मोकळे, निरंकुश ठेवणे ही सरकारबरोबरच अन्य संस्थांचीही जबाबदारी आहे. सकस साहित्यनिर्मितीसाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्य आवश्यक आहे.’’

साहित्य संमेलने आयोजित करण्यात आर्थिक मिंधेपण येऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली. या बाबतीत त्यांनी गंगाधर पानतावणे यांच्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा दाखला दिला. साहित्य संमेलनाचा खर्च सरकारकडून घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उद्देशून देशमुख म्हणाले, सरकारने शाळांचे मराठीकरण आणि मराठी शाळांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. मराठी शाळा बंद करता कामा नये. मराठीची गळचेपी थांबवण्यासाठी मराठीच्या सक्तीचा कायदा करणे गरजेचे आहे.

कला ही राजाश्रित नव्हे तर राज्यपुरस्कृत हवी – तावडे

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा प्रकार राज्य सरकारलाही अमान्य आहे. परंतु या प्रकारात सरकारला गोवण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी साहित्य संमेलनाच्या  व्यासपीठावरून केले. कला ही राजाश्रित नव्हे तर राज्यपुरस्कृत हवी, असे मतही त्यांनी मांडले.

 

First Published on January 12, 2019 12:36 am

Web Title: nayantara sahgal akhil bharatiya marathi sahitya sammelan 2019 2