ज्येष्ठ साहित्यीक नयनतारा सहगल यांचे 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनीच रद्द केले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे ई-मेलद्वारे सहगल यांना कळवण्यात आलं आहे. यजमान संस्थेनेच एका ई-मेलद्वारे रद्द केल्याने साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही व्यक्त होत आहेत. त्यांचे भाषण वादग्रस्त होईल या भीतीपोटी हे पाऊल संमेलन आयोजकांनी उचलल्याची चर्चा आहे.

यवतमाळ येथे ता. 11, 12 व 13 जानेवारीला 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार असून त्यांच्याच नेतृत्वात डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय ही यजमान संस्था व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने या संमेलनाचे आयोजन केले आहे.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांचे नाव उद्घाटक म्हणून सुचविले होते. त्यांच्या शिफारसीवरूनच यजमान संस्थेने नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून निमंत्रण पाठविले होते. या निमंत्रणाचा स्वीकार सहगल यांनी सहर्ष केला होता. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून इंग्रजी साहित्यिकास निमंत्रित केल्यामुळे शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी टीका केली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला. त्यामुळे संमेलनात गोंधळ होऊ नये, म्हणून यजमान संस्थेने नयनतारा सहगल यांना ई-मेल पाठवून निमंत्रण रद्द करण्यात येत असल्याचे कळविले. त्यात अपरिहार्य कारणामुळे हे निमंत्रण रद्द करण्यात येत असून आपण या संमेलनास येऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.  ‘संमेलनात गोंधळ होऊ नये, म्हणून नयनतारा सहगल यांच्या नावावर फेरविचार करण्याची विनंती संमेलनाच्या आयोजन समितीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना केली. त्यांच्या निर्देशावरून सहगल यांना निमंत्रण रद्द केल्याचे कळविले आहे’, अशी माहिती मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीचे सहसचिव पद्माकर मलकापुरे यांनी दिली.

यवतमाळमध्ये ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होते. पण शेतकरी न्याय हक्क समितीने नयनतारा सहगल यांच्या नावाला आक्षेप घेतला होता तर मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी साहित्यिकांच्या हस्ते का? असा प्रश्न उपस्थित करत मनसेने हे संमेलन उधळण्याचा इशारा सुरूवातीला दिला होता, पण नंतर त्यांची भूमिका काहीशी मवाळ झाली होती. मात्र, देशात होत असलेल्या साहित्यिक, विचारवंत यांच्या हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा, मॉब लिंचीग याबाबत नयनतारा सहगल यांची मते परखड आणि झुंजार आहेत. या सर्व मुद्द्यांचा नयनतारा सहगल यांच्या भाषणात उल्लेख होणार होता. त्यांच्या या भूमिकेचा आगामी निवडणुकांवर परिणाम होईल, या भीतीतून त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

कोण आहेत नयनतारा सहगल?
देशात असहिष्णू वातावरण आहे अशी तक्रार करत पुरस्कार परत करण्यात पुढाकार घेणाऱ्या पहिल्या साहित्यिक म्हणजे नयनतारा सहगल. त्यांच्यासह १० दिग्गज साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची तरतूद नसल्याने आपण हा पुरस्कार पुन्हा स्विकारतोय असंही त्यांनी म्हटलं होतं. नयनतारा सहगल या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाची आहेत. १९८६ मध्ये त्यांना रिच लाइक अस या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.